औरंगाबाद : सिडको-हडकोतील पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. नियोजित वेळेवर, तारखेला पाणी अजिबात येत नाही. त्यामुळे सर्वसामान्य चाकरमान्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. युद्धपातळीवर पाणीपुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी मंगळवारी सकाळी १० वाजेपासून भाजप नगरसेवकांनी सिडको एन-७ येथील पाणीपुरवठा कार्यालयासमोर ‘मुक्काम आंदोलन’ सुरू केले. महापालिका आयुक्त यांनी आश्वासन दिल्यानंतरही आंदोलकांनी आंदोलन सुरूच ठेवले आहे.नक्षत्रवाडी एमबीआरपासून सिडको-हडकोसाठी स्वतंत्र एक्स्प्रेस जलवाहिनी टाकण्यात आली आहे. सिडको एन-५, एन-७ येथील दोन मुख्य पाण्याच्या टाक्यांपर्यंत पाणी येईपर्यंत पन्नास ठिकाणी जलवाहिनी फोडून थेट पाणी देण्यात येते. सिडको-हडकोला जेमतेम पाण्यावर मागील काही दिवसांपासून समाधान मानावे लागत आहे. सिडको एन-३, एन-४ येथील वसाहतींना पुंडलिकनगर येथून पाणी द्यावे असा आग्रह भाजपने धरला आहे. हा वाद महापौरांनी पाणीपुरवठ्याचे पुणे येथील तज्ज्ञ होलानी यांच्याकडे सोपविला. त्यानंतर लगेच भाजपच्या नगरसेवकांनी मुक्काम आंदोलनाचे शस्त्र उपसले. सिडको-हडकोतील विविध वसाहतींना पाच ते सहा दिवसांनंतर पाणीपुरवठा होत आहे. या भागातील विस्कळीत पाणीपुरवठा पूर्ववत करावा या मागणीसाठी एन-७ येथील पाणीपुरवठा कार्यालयासमोर नगरसेवक नितीन चित्ते, पुष्पा रोजतकर, सुरेखा खरात, माजी नगरसेवक माळवदकर यांच्यासह शेकडो नागरिकांनी आंदोलन सुरू केले. कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, उपअभियंता सरताजसिंग चहेल यांनी आंदोलकांची भेट घेऊन मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनीही दूरध्वनीवर बुधवारी मुख्यमंत्री येऊन गेल्यावर पाणी प्रश्नात तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. मात्र, नगरसेवक, नागरिकांनी आंदोलन सुरूच ठेवले.
पाण्यासाठी भाजप नगरसेवकांचे मुक्काम आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2018 11:39 PM
सिडको-हडकोतील पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. नियोजित वेळेवर, तारखेला पाणी अजिबात येत नाही. त्यामुळे सर्वसामान्य चाकरमान्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. युद्धपातळीवर पाणीपुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी मंगळवारी सकाळी १० वाजेपासून भाजप नगरसेवकांनी सिडको एन-७ येथील पाणीपुरवठा कार्यालयासमोर ‘मुक्काम आंदोलन’ सुरू केले. महापालिका आयुक्त यांनी आश्वासन दिल्यानंतरही आंदोलकांनी आंदोलन सुरूच ठेवले आहे.
ठळक मुद्दे शिष्टाई अयशस्वी : आयुक्तांच्या आश्वासनानंतरही आंदोलन सुरू