वाळूज महानगर : काही वर्षांपासून एमआयडीसी प्रशासनाकडून मान्सूनपूर्व नालेसफाईकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. यंदाही पावसाळा तोंडावर आला तरी अजून मान्सूनपूर्व नालेसफाई संदर्भात एमआयडीसी शांतच आहे. बजाजनगरातील मुख्य नाल्यासह अंतर्गत गटारे कचरा व मातीने तुंबली आहेत. परिस्थिती अशीच राहिली तर पावसाळ्यात नाला व गटारातील सांडपाणी नागरी वसाहतीत शिरण्याची भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिक प्रशासन मान्सूनपूर्व नालेसफाई कधी करते या प्रतीक्षेत आहेत.
बजाजनगर निवासी क्षेत्राला पायाभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी एमआयडीसी प्रशासनाची आहे. मात्र, सर्व सोयी-सुविधा पुरविण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याने नागरिकांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. वेळेवर साफसफाई केली जात नसल्याने निवासी क्षेत्रात अनेक ठिकाणी अस्वच्छता पसरली आहे. नाले व अंतर्गत गटारीचीही यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. वेळेवर नालेसफाई केली जात नाही.
निवासी क्षेत्रातून वाहणाऱ्या गटारी अनेक ठिकाणी कचरा व मातीने तुंबल्या आहेत. काही भागात नाल्यावर ढापे नसल्याने उघड्यावरुनच वाहतात. तर काही ठिकाणी ढापे तुटले असून, मोडकळीस आले आहेत. त्यामुळे नागरिकांना सांडपाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. एमआयडीसीने अयोध्यानगरातून वाहणाºया मुख्य नाल्याचे खाजगी ठेकेदाराकडून नुकतेच बांधकाम केले आहे. मात्र, संबंधित ठेकेदाराने नाल्याचा मुख्य प्रवाह खूपच लहान केला असून, हे कामही अर्धवटच आहे. उलट नाल्याचे सपाटीकरण केल्यामुळे नाल्यातील पाणी वसाहतीत शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे.
सीतानगर लगत असलेल्या नाल्याचे काम रखडले असून, हा नाला कचरा व मातीने भरला आहे. शिवाय काटेरी झाडे झुडपेही वाढले आहेत. नागरी वसाहतीतून वाहणारे नाले, गटारी अनेक ठिकाणी उघडी पडली असून, संरक्षण भिंतीही जीर्ण झाल्या आहेत.या विषयी एमआयडीसीचे अभियंता बी.एस दिपके म्हणाले की, आचार संहितेमुळे नालेसफाईचे काम थांबले आहे. आचारसंहिता संपताच निविदा काढून नालेसफाई करण्यात येणार आहे. असे लोकमतशी बोलताना त्यांनी सांगितले.