औरंगाबाद : जोरजोरात गाणे वाजवत आणि नियमांचे उल्लंघन करून रस्त्यावर धावणाऱ्या बेशिस्त रिक्षांवर गुरुवारी वाहतूक पोलीस आणि आरटीओ कार्यालयाच्या पथकांनी कारवाईचा बडगा उगारला. यावेळी दंडात्मक कारवाईबरोबरच अनेक रिक्षा जप्त करून आरटीओ कार्यालयात उभ्या करण्यात आल्या.
शहरातील चौकाचौकात रिक्षांना अडवून कारवाई केली जात होती. या कारवाईनंतर काही रिक्षाचालकांनी आरटीओ कार्यालयात जाऊन नाराजी व्यक्त केली. दहा हजार रुपये दंड कसा भरणार, असा प्रश्न उपस्थित केला. नियमांचे पालन केल्यास, कागदपत्रे योग्य ठेवल्यास कारवाई होत नाही, असे अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले.
का सुरू केली कारवाई ?शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडली असून, खुनाच्या घटना घडत आहेत. याशिवाय टवाळखोर, झुंडशाही करणाऱ्यांच्या टोळक्यांमध्ये वाढ झाली असून, या प्रवृत्तीला वेळीच रोखून नागरिकांना सुरक्षितता देण्याची मागणी करणारे निवेदन शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त डाॅ. निखिल गुप्ता यांना बुधवारी दिले. यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विविध प्रश्नांसह बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर गुरुवारी सकाळपासूनच वाहतूक पोलीस आणि आरटीओ कार्यालयाच्या पथकाने नियमांचे उल्लंघन करून धावणाऱ्या रिक्षांवर कारवाई सुरू केली.
२० रिक्षा जप्तपीयूसी नसणे, फिटनेस नसणे, परमिट नसणे, लायसन्स नसणे यासह नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षांवर कारवाई करण्यात येत आहे. जवळपास २० रिक्षा जप्त करण्यात आल्याचे प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार यांनी सांगितले.