औरंगाबाद : जायकवाडी धरणात सध्या ४१.९४ टक्के जलसाठा असून मागील वर्षाच्या तुलनेत हा जलसाठा फक्त ५० टक्के इतका आहे. ऑगस्ट महिना संपत आला असून सप्टेंबरमध्ये परतीच्या पावसाला सुरुवात होते. या काळात जर धरणक्षेत्रात दमदार पाऊस बरसला नाही तर पुढील वर्षातील पाणीवापर, वाटप आणि नियोजनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
जायकवाडी धरणात एकूण ४२ योजनांना पाणीपुरवठा केला जातो. सोबत पिण्याचे, उद्योगांचे पाणी आरक्षित आहे. त्यातच आता ब्रह्मगव्हाण योजनेसाठी देखील पाणी आरक्षित करण्यात आले आहे. असे असताना जायकवाडीत यंदाच्या पावसाळ्यात मुबलक पाणीसाठा आलेला नाही. नाशिक आणि गोदावरी खोऱ्यात समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे जायकवाडीत गेल्यावर्षीच्या तुलनेत ५० टक्केच साठा आहे.
मागील वर्षी धरणात ८६.८९ टक्के जलसाठा होता. त्यातील १८६४ दशलक्ष घनमीटर पाणी उपयुक्त साठ्यातील होते. यावर्षी ९१० दशलक्ष घनमीटर उपयुक्त जलसाठा आहे. मागीलवर्षी आजच्या तारखेपर्यंत धरणक्षेत्रात ६२७ मि.मी. पाऊस झाला. यंदाच्या पावसाळ्यात १ जूनपासून आजपर्यंत ४५३ मि.मी. पावसाची नोंद झाली असली तरी धरणांतील साठ्याचा टक्का वाढला नाही. जायकवाडीची पूर्ण पाणीपातळी ४६३ मीटर आहे. उपयुक्त जलसाठ्याचे प्रमाण २१७० दलघमी आहे.