औरंगाबाद : ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार हळूहळू अंतिम टप्प्यात येत असून, १५ जानेवारी रोजी जिल्ह्यातील ६१७ ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. सुमारे १५ लाख मतदार निवडणुकीचा हक्क बजावणार आहेत. यात कोरोना पॉझिटिव्ह, क्वारंटाईन असलेल्या मतदारांना मतदान करता येणार की नाही. त्यासाठी शेवटच्या तासात काही वेळ देण्यात येणार की नाही. याबाबत राज्य निवडणुक आयोगाकडून काहीही सूचना अद्याप आलेल्या नाहीत, अशी माहिती समोर आली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणुका होत असल्यामुळे प्रत्येक मतदाराचे स्क्रिनिंग करूनच त्यांना मतदान केंद्रात सोडण्याची तयारी प्रशासनाने केली आहे.
निवडणूक मैदानात ११४९९ उमेदवार आहेत. जिल्ह्यातील ९ तालुक्यांतील एकूण २०९० प्रभाग आणि २२६१ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. मतदान केंद्रांत वैजापूर ३१५, सिल्लोड ३३६, कन्नड ३१२, पैठण ३२१, औरंगाबाद ३१६, गंगापूर २८७, फुलंब्री १७१, सोयगाव ११४, खुलताबाद ८९ केंद्रांचा समावेश आहे.
आयोगाची माहिती अशी
मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत कोरोना सदृश लक्षणे असलेल्या किंवा कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या मतदारांना शेवटच्या तासात मतदानासाठी मुभा देण्यात आली होती. ग्रामपंचायत निवडणुकीत अद्याप तसा काही निर्णय झालेला नाही. असे निवडणूक आयोगाचे सहायक आयुक्त जे.टी.मोरे यांनी सांगितले. उपजिल्हाधिकारी रिता मैत्रेवार म्हणाल्या, क्वारंटाईन आणि कोरोना पॉझिटिव्ह मतदारांबाबत निवडणूक आयोगाकडून काहीही सूचना आलेल्या नाहीत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काय काळजी घेतली जात आहे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग बीडीओ आणि ग्रामपंचायतींच्या सहकार्याने मतदानाच्या दिवशी स्क्रिनिंग करणार आहे. सॅनिटायझर आणि पल्स ऑक्सिमीटर, थर्मल गनचा वापर करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे.
जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती अशी
जिल्ह्यातील एकूण रुग्ण ४६ हजार २४३
बरे झालेले रुग्ण ४४६०६
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण ४२२
होम क्वारंटाईन केलेले रुग्ण ६४७१