औरंगाबाद : कोरोना, लॉकडाऊन या सगळ्यात जीम, मैदाने, स्वीमिंग, विविध खेळ यासारखे व्यायाम प्रकार बंद पडले. यामुळे मग बहुतांश लोकांनी जुना पण अतिशय परिणामकारक असा सायकलिंगचा व्यायाम प्रकार निवडला आणि अडगळीत पडलेल्या सायकलला पुन्हा सन्मानाचे दिवस आले. वाढत्या मागणीमुळे आता सायकल घेण्यासाठी चक्क वेटिंग करावे लागत असल्याचे चित्र सध्या बाजारात दिसते आहे.
मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लाॅकडाऊन करण्यात आले. यामुळे सर्वजण स्तब्ध झाले.घराबाहेर पडणे बंद झाल्याने अनेकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले.त्यातच अनेकांना वजनवाढीची समस्या उदभवली त्यामुळे पारंपरिक म्हणून अनेकांनी सायकलिंगवरच भर दिला. सकाळी किंवा रात्री शहरातील मुख्य रस्त्यांवरून फेरफटका मारला तर सायकल चालविणाऱ्यांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाल्याचे लक्षात येते. यामध्ये अनेकदा आई-वडील आपल्या लहान मुलांसोबत सायकल चालविण्यासाठी बाहेर पडल्याचे दिसून येते. लॉकडाऊनपूर्वी महिन्याकाठी ५०० च्या आसपास सायकल विक्री व्हायची, ती आता ६०० च्या पुढे गेली आहे.
सायकलिंगचे फायदे अनेककोरोनाकाळात फुफ्फुसांची ताकद वाढविण्यासाठी व्यायाम करणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे आपोआपच चयापचय क्रिया चांगली होते. याशिवाय स्नायूंची क्षमता वाढणे, हाडांना बळकटी मिळणे यासारखे अनेक फायदे सायकलिंगमुळे होतात, असे तज्ज्ञांनी सांगितले.
सायकलिंग अत्यंत आवडतेएमबीबीएस झाल्यानंतर एमडीसाठी युरोपात असताना अभ्यास, परीक्षा या सगळ्यांमध्ये खूप वजन वाढले. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी विविध व्यायाम आणि सायकलिंगही सुरू केले; पण सगळ्यात जास्त सायकलिंगच आवडली आणि तेव्हापासून दररोज सायकलिंगच करतो. सायकलिंगच्या विविध स्पर्धांमध्येही सहभागी होतो आणि बऱ्याचदा कामासाठी बाहेर जाताना सायकलच वापरतो. - डॉ. प्रफुल्ल जताळे
महिलांचा वाढता कललॉकडाऊननंतर सायकलच्या मागणीत ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. सायकल दुरुस्तीसाठी घेऊन येणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. ३० हजार रुपयांपर्यंतच्या सायकलला ग्राहकांची जास्त मागणी आहे.- निखिल मिसाळ, सायकल विक्रेते