----
औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागात कार्यरत स्थापत्य अभियांत्रिकी सहायक हे २२ स्थायी कर्मचारी अतिरिक्त असल्याचे मृद व जलसंधारण आयुक्तांनी सांगितले. त्यामुळे जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या मूळ आस्थापनेवर वेतनाकरिता रिक्तपदांवर सामावून घ्यावे, तसेच ऑगस्ट २०२० पासून रखडलेले वेतन देण्याची मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मंगेश गोंदावले यांच्याकडे अभियंता संघटनेने निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्हा परिषदेचे जिल्हा जलसंधारण अधिकारी यांच्या अंतर्गत येणाऱ्या लघु पाटबंधारे विभागाच्या ४ उपविभागांमध्ये प्रत्येकी सात असे २८ स्थापत्य अभियांत्रिकी सहायक कार्यरत आहेत. त्याचे ऑगस्ट २०२० पर्यंत वेतन व भत्ते रोजंदारी अस्थायी कर्मचारीमधून अदा करण्यात आले. मात्र, आकृतीबंधानुसार सिंचन विभागात ४ पदे मंजूर असल्याने त्या चार जणांचे वेतन व भत्ते नियमित आस्थापनेवर होत आहेत, तर इतर २४ स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकांच्या वेतन व भत्त्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातील काहीजण नुकतेच सेवानिवृत झाले. त्यांच्या निवृत्तिवेतनातही अडसर आला. यातील एकजण कर्करोगग्रस्त असून, त्यांना उपचारातही अडचणी निर्माण झाल्या. इतर २२ जणांंचे दिवाळी, दसरा हे सणही आर्थिक कुचंबनेत गेले. या कर्मचाऱ्यांना बांधकाम विभागाच्या मूळ आस्थापनेवर सामावून घेत वेतन व भत्ते सुरू करण्याची मागणी जिल्हा परिषद अभियंता संघटनेने गोंदावले यांच्याकडे केली.