लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : संत एकनाथ रंगमंदिराचे पुनरुज्जीवन करण्याची घोषणा करून आता दोन महिने उलटून गेलेले आहेत. अद्यापही याबाबत कोणतेही पाऊल उचलले गेलेले नाही. अभिनेता सुमित राघवनने फेसबुकवर शहरातील नाट्यगृहाचे वाभाडे काढल्यानंतर लोकप्रतिनिधींनी केलेली कोट्यवधींची घोषणा नेहमीप्रमाणे केवळ घोषणा बनून राहते की काय, अशी शंका निर्माण झाली आहे.औरंगाबाद महानगरपालिकेच्या ताब्यात उस्मानपुºयातील संत एकनाथ रंगमंदिर आणि सिडकोतील संत तुकाराम नाट्यगृह, अशी दोन नाट्यगृहे आहेत. शहराला लाभलेल्या मोठ्या नाट्यपंरपरेला पुढे नेण्याचे काम या दोन्ही नाट्यगृहांतून चालणे अपेक्षित आहे. मात्र, असुविधा आणि अनास्थेच्या विळख्यात अडकून पडल्यामुळे ही नाट्यगृहे केवळ शाळा-महाविद्यालयांचे गॅदरिंग आणि राजकीय मेळाव्यांची सभागृहे बनलेली आहेत. सुमित राघवन प्रकरणानंतर खा. चंद्रकांत खैरे, आ. संजय शिरसाट व महापौर बापू घडमोडे यांनी त्वरित संत एकनाथ रंगमंदिराचे नूतनीकरण केले जाईल, अशी घोषणा केली होती. त्यानुसार १५ आॅगस्टपासून नाट्यगृह बंद करून दुरुस्तीचे काम हाती घेतले जाईल, असेही सांगण्यात आले. त्यासाठी पालकमंत्री रामदास कदम यांच्याकडून सुमारे दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही देण्यात आले होते. सर्व लोकप्रतिनिधी असे एकापाठोपाठ एक नाट्यगृह जगविण्याच्या आणाभाका घेत असल्याचे पाहून नाट्यप्रेमींच्या आशा पल्लवित झाल्या. मात्र, दोन महिने उलटूनही काम सुरू झालेले नाही. किमान यावर्षी तरी नूतनीकरणाच्या कामास प्रारंभ होईल का? असा सवाल नाट्यप्रेमी विचारत आहेत.
रंगमंदिर दुरुस्तीच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 1:13 AM