औरंगाबाद : आपण मोकळा भात खाण्याचे शौकीन असाल व कोलम तांदूळ खरेदी करीत असाल तर जरा सावधान, कारण कोलम म्हणून तुमच्या माथी आरएनआर नावाचा तांदूळ मारण्यात आला नाही ना याची खात्री करून घ्या.
नवीन तांदळाचा हंगाम सुरू झाला आहे. जाधववाडी कृउबा समिती व जुन्या मोंढ्यात ४० ते ४५ व्हरायटीचा नवीन तांदूळ विक्रीसाठी आला आहे. तांदूळ वर्षभर विक्री होत असला तरी एकदाच वर्षभराचा तांदूळ विकत घेणाऱ्या ग्राहकांची संख्या काही कमी नाही. यामुळे आता वार्षिक तांदूळ खरेदीला सुरुवात झाली आहे. शहरात एकूण विक्री होणाऱ्या तांदळापैकी सुमारे ५० टक्के कोलम तांदूळ विकला जातो, अशी माहिती होलसेल व्यापाऱ्यांनी दिली.
कोलम तांदळाचा भात खाण्यास नरम व चवदार लागत असल्याने या तांदळाला मागणी असते. स्थानिक बाजारपेठेत नागपूर, चंद्रपूर भागातून कोलमची आवक होते. दररोज ४०० ते ५०० क्विंटल नवीन कोलम बाजारात विक्रीला येतो; मात्र सध्या आंध्र प्रदेश व तेलंगणा या राज्यातून कोलमसारखा दिसणारा आरएनआर नावाचा तांदूळ विक्रीला येऊ लागला आहे. कोलम ४२०० ते ४८०० रुपये, तर आरएनआर ३६०० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल विकला जातो. दोन्ही तांदळात क्विंटलमागे ६०० ते ८०० रुपयांपर्यंतचा फरक आहे. ९५ टक्के ग्राहकांना या तांदळातील फरक कळत नाही.
या अज्ञानाचा फायदा घेत काही व्यापारी कोलमसारखाच दिसत असल्याने आरएनआरलाच कोलम म्हणून विक्री करीत आहेत. यासंदर्भात तांदळाच्या होलसेल विक्री करणाऱ्या एका व्यापाऱ्याने सांगितले की, कोलम तांदूळ बारीक असतो, चवदार व मोकळा भात होत असल्याने त्याला जास्त मागणी असते. कोलम आणि आरएनआर या दोन्ही तांदळात जास्त फरक नसल्याने किराणा व्यापारीही अनेकदा फसतात तर ग्राहकांचे काय. ग्राहकांनी चौकशी करूनच विश्वासू दुकानदारांकडून तांदूळ खरेदी करावा, असा सल्लाही त्यांनी दिला.
स्वस्त तांदळाची महागात विक्रीआरएनआर तांदळापेक्षा कोलम तांदूळ क्विंटलमागे ६०० ते ८०० रुपयांपर्यंत महाग आहे. दिसायला दोन्ही तांदूळ सारखे असल्याने काही व्यापारी आरएनआर तांदूळ कोलम म्हणून विकतात. यात नफा जास्त मिळतो; पण ग्राहकांची फसवणूक होते.