छत्रपती संभाजीनगर : प्रत्येक भूमीचे एक वैशिष्ट्य असते, मराठवाडा ही संतांची भूमी आहे. एकनाथांनी वंचित घटकातील तहानलेल्या मुलाला पाणी पाजून जगाला समतेचा संदेश दिला. हीच मानवतेची परंपरा उर्दू शाहिरांनीही जपली. याच मराठवाड्यातील पहिले उर्दू साहित्यिक वली औरंगाबादी हे देखील याच पवित्र भूमीने जगाला दिले. त्यासोबतच बशर नवाज, सिराज औरंगाबादी, दाऊद औरंगाबादी, सिकंदर औरंगाबादी, सफी औरंगाबादी यांच्या उर्दूतील योगदानाने मराठवाडा ही भूमी उर्दूचे माहेरघर ठरते, असे प्रतिपादन ज्येष्ठ गजलकार तथा अलिगढ मुस्लीम विद्यापीठातील उर्दू विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. सगीर अफ्राहीम यांनी केले.
एमजीएम विद्यापीठातील उर्दु विभाग व बज्म-ए- ततहीर ए अदब यांच्यातर्फे ‘महाराष्ट्र में उर्दू अदब की सूरत-ए – हाल’ या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले होते. या चर्चासत्राच्या उद्घाटनावेळी डॉ अफ्राहीम यांनी बिजभाषण केले. अध्यक्षस्थानी डॉ. ए.जी. खान होते. व्यासपीठावर कुलपती अंकुशराव कदम, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, अधिष्ठाता डॉ. रेखा शेळके, प्रख्यात उर्दू कथाकार नुरुल हसनेन, संचालक डॉ. शैली अस्थाना यांची उपस्थिती होती. यावेळी ‘महफिल ए मुशायरा’मध्ये असलम मिर्झा, डॉ. सलीम मोहीउद्दीन, फारूक समिम, रझा जालनवी, युसूफ साबेर, डॉ. समी सिद्दिकी, अहेमद औरंगाबादी, मुक्वादिशा, इम्रान रझवी, वशिम राही, बिलाल अन्वर, डॉ. रिहाना सय्यद, डॉ. शहनाज बासमेह या देशभरातून आलेल्या गझलकारांनी आपल्या गझल सादर करून रसिकांना साडेतीन तास खिळवून ठेवले. या चर्चासत्रात देशभरातून आलेल्या १२० संशोधकांनी तीन सत्रांत संशोधन सादर करून चर्चा केली. चर्चासत्रांचे सूत्रसंचलन डॉ. साजिद आलम, नुरूलौन खान यांनी, तर आभार संयोजक डॉ. असवद गौहर व डॉ. शहनाज बासमेह यांनी मानले.