शहरातील प्रत्येक रुग्णवाहिका चालकाला आजच्या घडीला कमी - अधिक प्रमाणात याच परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. यातूनच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येते. अशोक बोरुडे यांची रुग्णवाहिका असून अनेकदा ते कोविडच्या रुग्णांना घेऊन जातात, तर कधी त्यांच्याकडे असलेले चालक हे कर्तव्य पार पाडतात.
सध्या अतिशय बिकट अवस्था असून रोजच नव्या रुग्णांचे हाल आणि त्यांच्या नातेवाईकांचे दु:ख आम्ही पाहत असल्याचे बोरुडे म्हणाले.
रुग्णवाहिका जास्त भाडे आकारतात, असे अनेकदा बोलले जाते. पण सध्या आम्हालाही अवाच्या सवा किंमत मोजून ऑक्सिजन घ्यावा लागतो. अनेकदा गाडीत कोविड रुग्ण असतो, पण त्यांचे पैसे वाढतील म्हणून आम्ही अनेकदा आमच्या जिवाची जोखीम पत्करून कधीकधी पीपीई कीट घालणेही टाळतो. कारण सगळ्यांचीच पैसे देण्याची ऐपत नसते, याची आम्हालाही जाण आहे, असेही रुग्णवाहिका चालक म्हणाले.
चौकट :
पैसे असून उपयोग नाही
एक प्रसंग सांगताना बोरुडे म्हणाले की, दोन - तीन दिवसांपूर्वीच रुग्णवाहिकेत अवघे ४० वय असलेली एक महिला कोविडमुळे अतिशय गंभीर अवस्थेत होती. गाडीत त्या महिलेची मुले आणि इतर नातेवाईकांचा सुरू असणारा आक्रोश आम्हालाही अस्वस्थ करत होता. त्या रुग्णाला घेऊन आम्ही जवळपास ७ दवाखाने फिरलो, तरीही बेड मिळाला नाही. शेवटी अधिक उशीर होऊ नये म्हणून नाईलाजाने घाटी गाठले आणि रुग्णाला तिथे सोडून आलाे. तुमच्याजवळ कितीही पैसे असले तरी काहीही उपयोग होत नाही, हे त्या प्रसंगातून जाणवून गेले.
चौकट :
या कोरोनात माणुसकी हरवली हो...
या कोरोनात खरोखरच उरली - सुरली माणुसकी हरवून गेली आहे. आम्हाला जेव्हा कोविड रुग्णाला न्यायचे असते, तेव्हा बऱ्याचदा नातेवाईक रुग्णासोबत गाडीत यायला, रुग्णाला हात लावायला तयार होत नाहीत. त्यामुळे मग आम्हालाच रुग्णाला धरावे लागते, दवाखान्यात हलवावे लागते. त्यावेळी हरवलेली माणुसकी पाहून खूप वाईट वाटते, असेही बोरुडे यांनी सांगितले.