औरंगाबाद : देशात हिंदू विरुद्ध मुस्लीम अशा पेटवलेल्या राजकारणातून दुरावलेली मने आणि त्यात कोरोनाने भरलेल्या दहशतीमुळे सर्वच माणसं एकमेकांपासून अंतर राखत आहेत. औरंगाबादमध्ये मात्र, धर्माधर्मात उभारलेल्या भिंती पाडून माणसं माणसांच्या मदतीला धावत आहेत. एका बंगाली हिंदू कारागिराच्या अपंग मुलाचा नैसर्गिक मृत्यू झाला. त्यांच्या मदतीला कुणीच नसल्याचे पाहून तिरडीला खांदा देण्यास काही मुस्लिम बांधव पुढे आले. त्यांनी हिंदू रीतीरिवाजानुसार त्याच्यावर संस्कार केले.
बंगाली सुवर्ण कारागीर दुलाल घोडाई हे मागील २५ वर्षांपासून सराफा रोडवर फ्लॅटमध्ये राहतात. त्यांना दोन मुलं असून त्यातील एक सुभोह घोडाई हा १५ वर्षाचा दिव्यांग मुलगा. मागील काही वर्षांपासून तो आजाराने पलंगावरच पडून होता. त्याचे मंगळवारी सकाळी निधन झाले. त्याचा मृत्यू कोविडने झाला असावा या भीतीने परिसरातील व्यक्ती मदतीला आले नाहीत. मात्र, त्यांचे दोन - तीन नातलग आले. या बंगाली कारागिराने आधार कार्ड काढले नाही. घरीच निधन झाल्याने हॉस्पिटलमधील कागदपत्र नव्हते. यामुळे अंत्यसंस्कार करण्यासाठी परवानगी दिली जात नव्हती.
ही माहिती दुलाल घोडाई यांचे मित्र नूर इस्लाम शेख यांना कळली. ते सुद्धा मूळचे कोलकाता येथीलच. त्यांनी सामाजिक कार्यकर्ते आलीम बेग यांना सोबत घेऊन घोडाई यांचे घर गाठले व त्यांना धीर दिला. सिटी चौक पोलिसांना सर्व हकीकत सांगितली. मनपात जाऊन अंत्यसंस्काराची परवानगी आणली. दुपारी स्वर्गरथ आणला. हिंदू रीतीरिवाज पाळून पार्थिवाला अंघोळ घातली. तिरडी बांधली. घोडाई यांच्या नातेवाईकांसोबत पाच ते सहा मुस्लीम बांधवांनी तिरडीला खांदा दिला. अंत्ययात्रा कैलासनगर स्मशानभूमीत आणून पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी दुलाल घोडाई यांनी अभिमानाने सांगितले की, नूर इस्लाम शेख, आलीम बेग हे माझे मित्रच नसून भाऊ आहेत. हे वाक्य ऐकून सर्वांच्या डोळ्यात अश्रू तरळले.
दरी कमी करण्याचा प्रयत्नऔरंगाबादमध्ये मध्यंतरी झालेल्या दंगलीमुळे शहराचे नाव बदनाम झाले होते. काळ पुढे चालला तसे शहरात हिंदू- मुस्लीम यांच्यातील दरी कमी करण्याचे प्रयत्न होत आहे. हिंदुंच्या अंत्यसंस्काराला मुस्लीम बांधव व मुस्लीम बांधवांच्या दफन विधीला हिंदू बांधव जात आहेत व एकमेकांना धीर देत आहेत.- आलीम बेग, सामाजिक कार्यकर्ते
कोरोना काळात मानवतेचे दर्शनराजकारणी कितीही प्रयत्न करो पण शहरातीलच नव्हे तर देशातील एकात्मता, अखंडता, सर्वधर्मसमभाव यास तोडू शकणार नाही. मानवता धर्मच कोरोना काळात एकमेकांच्या सुखदुःखात कामी येत आहे.- नूर इस्लाम खान