- संतोष उगलेवाळूज महानगर : एमआयडीसी पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या तिसगाव-वडगाव मार्गावर साईबाबा चौकात गोळी झाडून एकाची हत्या केल्याची घटना कचरा टाकण्यासाठी आलेल्या महिलांच्या शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास निदर्शनास आली. घटनेची माहिती सरपंच सुनील काळे यांनी पोलिसांना देताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. खून झालेल्या तरुणाचे नाव कपिल पिंगळे (रा. रांजणगाव) असे आहे.
शुक्रवारी पहाटे साईनगर सिडको येथील महिला कचरा टाकण्यासाठी तिसगाव - वडगाव मार्गावरील साईबाबा चौकात गेल्या असता त्यांना रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेला तरुण दिसला. घाबरलेल्या महिलांनी घरी येऊन हा प्रकार पतीच्या कानावर टाकला. क्षणात घटनेची माहिती परिसरात पसरली. पुढे माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोनि कृष्णा शिंदे, फौजदार संदीप शिंदे, सहाय्यक फौजदार विकास वैष्णव, विशेष शाखेचे योगेश शेळके, विक्रम वाघ, राजेभाऊ कोल्हे, बाळासाहेब आंधळे, डिबी पथकाचे विनोद नितनवरे, फौजदार मनोज शिंदे आदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी एक गावठी कट्टा आणि गोळी झाडल्यानंतर रिकामे राहिलेले एक काडतूस पोलिसांना आढळून आले.
मृत तरुणांची पोलिसांनी ओळख पटवली असता त्याचे नाव कपिल पिंगळे असून तो रांजणगावात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. खात्री करण्यासाठी पोलिसांनी तात्काळ त्याच्या नातेवाईकांची संपर्क साधला. कपिलच्या वडिलांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता तो आपलाच मुलगा कपिल असल्याचे सांगितले. काही वेळातच घटनास्थळी दाखल झालेल्या मृताच्या आईने एकच टाहो फोडला. आक्रोश करत कपिलच्या मारेकऱ्याचा तत्काळ शोध लावावा अशी मागणी केली.
खुनाचे कारण अस्पष्ट कपिल पिंगळेच्या छातीत गोळ्या घालून आरोपीने गावठी कट्टा जागीच सोडून घटना स्थळावरून पळ काढला. अद्याप कुणाचे कारण स्पष्ट झाले नसून आरोपी ताब्यात घेतल्यानंतर अनेक गोष्टी स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी दिली.
घटनास्थळी शेकडो मित्रांचा गोतावळा कपिलचा मित्रपरिवार दांडगा होता. त्याचा खून झाल्याची माहिती वाऱ्यासारखी वाळूज औद्योगिक परिसरात पसरली माहिती मिळताच त्याचा मित्रांनी घटनास्थळी धाव घेत गर्दी केली होती. लोकांची गर्दी आणि कपिलचे मित्र यांना दूर करण्यासाठी पोलिसांना चांगलेच प्रयत्न करावे लागले.