वाळूज महानगर: वाळूज परिसरात महावितरणकडून जवळपास ९ तासांचे भारनियमन करण्यात येत आहे. ऐन सणासुदीच्या काळात महावितरणकडून भारनियमन सुरु असल्यामुळे व्यवसायिक व वीज ग्राहकांत असंतोषाचे वातावरण पसरले आहे.
वाळूज सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या वाळूज, जोगेश्वरी, विटावा, घाणेगाव, नायगाव, बकवालनगर, कमळापूर, नारायणपूर, लांझी, एकलहेरा, नांदेडा तसेच बजाजनगर अंतर्गत येणाºया पंढरपुरात सक्तीने भारनियमन करण्यात येत आहेत. परिसरात दररोज सकाळी ६ ते ९.३०, दुपारी ३.४५ ते सांयकाळी ७.३० वाजेपर्यंत भारनियमन करण्यात येत आहे. आता दसरा-दिवाळी सण तोंडावर आला असून भारनियमनाच्या नावाखाली वीज पुरवठा दररोज खंडीत होत असल्याने व्यवसायिक व वीज ग्राहक त्रस्त झाले आहेत. नियमितपणे विज बिलाचा भरणा करुनही महावितरणकडून खंडीत विज पुरवठा केला जात असल्याने ग्राहकांमध्ये नाराजी पसरली आहे.
दुपारी व सांयकाळी भारनियमनामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी येणाºया नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या भारनियमनामुळे व्यवसायिकही अडचणीत सापडले आहेत. महावितरणकडून सुरु असलेल्या या सक्तीच्या भारनियमनामुळे या परिसरातील ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठ्याचे नियोजनही कोलमडले आहे. विजेअभावी जलकुंभ भरत नसल्यामुळे अनेक ठिकाणी कमी-अधिक दाबाने पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या पदाधिकाºयांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. या विषयी वाळूज सबस्टेशनचे उपअभियंता पी.एल.महाजन यांच्याशी संपर्क साधला त्यांनी ज्या ठिकाणी वीज गळतीचे प्रमाण जास्त व वसुलीचे प्रमाण कमी आहे, अशा ठिकाणी भारनियमन केले जात आहे.