मनपाविरोधात ग्रामसभेत ठराव घेणार : कराचा बोजा वाढण्याची भीती; सर्वपक्षीय समितीच्या माध्यमातून लढा उभारणार
ग्रामसभेत ठराव घेणार : कराचा बोजा वाढण्याची भीती, सर्वपक्षीय समितीच्या माध्यमातून लढा उभारणार
वाळूज महानगर : वाळूज महानगरातील सात ग्रामपंचायतीअंतर्गत येणारी गावे मनपा हद्दीत समाविष्ट करण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरू केल्याने या परिसरात खळबळ उडाली. मनपामुळे कराचा बोजा वाढण्याची भीती वर्तविली जात असून, नागरी सुविधांसाठी मात्र संघर्ष करावा लागणार असल्याने नागरिक व स्थानिक लोकप्रतिनिधींनी मनपात समाविष्ट होण्यास विरोध दर्शविला आहे.
सिडको वाळू जमहानगर १,२ व ४ मधील तीसगाव, गोलवाडी, वडगाव-बजाजनगर, पंढरपूर, वळदगाव, वाळूज आदी गावांचा समावेश मनपा हद्दीत करण्यात यावा, यासाठी सिडको प्रशासनाने मनपाकडे पाठपुरावा सुरू केला. स्थानिक ग्रामपंचायती, सिडको व एमआयडीसी प्रशासनाकडून या परिसरात नागरी सुविधा पुरविण्यात येतात. मनपा हद्दीत यापूर्वी समावेश केलेल्या पडेगाव, मिटमिटा, सातारा, देवळाई आदी गावांतील नागरिकांना विविध सुविधा पुरविताना मनपा प्रशासनाची दमछाक होत असून, नागरिकांना सुविधा मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.
वाळूज महानगरातील गावांचा मनपात समावेश झाल्यानंतर पाणीपट्टी, घरपट्टी तसेच इतर कराचा बोजा वाढण्याची भीती नागरिकांना आहे. या परिसरात बहुतांश कामगारवर्ग वास्तव्यास असून हा अर्थिक भुर्दंड त्यांना सोसावा लागेल. ग्रामपंचायतीमार्फत नागरी सुविधांसाठी माफक कर आकारण्यात येतो. त्यामुळे मनपात समाविष्ट होण्यास वाळूज महानगरवासीयांनी विरोध दर्शविला आहे.
गावांचा विकास करण्यासाठी ग्रामपंचायती सक्षम असून मनपात समाविष्ट होण्यास बहुतांश ग्रामपंचायती, जिल्हा परिषद व पंचायत समिती पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी सर्वपक्षीय कृती समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे वडगाव-बजाजनगरचे माजी सरपंच सचिन गरड, तीसगावचे उपसरपंच नागेश कुठारे, वळदगावचे सरपंच अमर डांगर, माजी पं. स. गणेश नवले, वाळूजच्या सरपंच सईदाबी पठाण, पंढरपूरच्या सरपंच वैशाली राऊत, उपसरपंच रेश्मा शेख आदींनी सांगितले. सिडकोच्या प्रस्तावाला विरोध करणारे ठराव लवकरच ग्रामसभेत पारित करून कृती समितीच्या माध्यमातून लढा उभारण्याचा इशाराही ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी दिला.
मनपा प्रशासक व सिडको प्रशासकांना शिष्टमंडळ भेटणार
कृती समितीने गुरुवारी (दि.२) सिडकोत तातडीची बैठक घेतली. मनपा प्रशासक अस्तिककुमार पांडे व सिडकोच्या मुख्य प्रशासक दीपा मुधोळ यांची शिष्टमंडळ शुक्रवारी (दि. ३) भेट घेणार असल्याचे कृती समितीचे नागेश कुठारे, नरेंद्र यादव, काकासाहेब बुट्टे, सुदाम जाधव, चंद्रकांत चोरडिया यांनी सांगितले.
-----------------------------