छत्रपती संभाजीनगर : एकत्रित प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गंत मोफत उपचार घेता येतात. त्यासाठी आयुष्मान कार्ड किंवा वैध फोटो ओळखपत्रासह संबंधित शिधापत्रिका, अन्य कागदपत्रे लागतात; मात्र, काही रुग्णालयांमध्ये आयुष्मान कार्ड नाकारून रेशनकार्ड, नाही तर तहसीलदार प्रमाणपत्र आणण्याची सक्तीच रुग्णांना केली जात असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या ‘रिॲलिटी चेक’मधून समोर आले.
एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत प्रतिवर्ष प्रतिकुटुंब ५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार महाराष्ट्र व देशातील इतर राज्यांमध्ये योजनेशी संलग्नित सरकारी किंवा खासगी रुग्णालयांत केले जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आयुष्मान कार्ड किंवा शिधापत्रिका, तसेच अन्य काही कागदपत्रे असणे आवश्यक आहे. आयुष्मान कार्ड असणाऱ्यांना शिधापत्रिका व अन्य कागदपत्रे देण्याची आवश्यकता नाही. मात्र, तरीही आयुष्मान कार्ड नाकारून अन्य कागदपत्रांची काही रुग्णालयांत सक्ती केली जात आहे.
काय अनुभव आला रुग्णालयांत?केस-१पदमपुरा परिसरातील एका रुग्णालयात योजनेच्या कक्षातील आरोग्य मित्राला उपचारासंदर्भातील कागदपत्रे देण्यात आली. सोबत आयुष्मान कार्ड असल्याचे सांगितले. तेव्हा आयुष्मान कार्ड चालणार नाही. रेशनकार्ड किंवा तहसीलदार प्रमाणपत्र लागेल, असे सांगण्यात आले.
केस-२शहरातील बुढीलेन परिसरातील रुग्णालयात उपचारासाठी योजनेच्या कक्षातील आरोग्य मित्राकडे आयुष्मान कार्ड देण्यात आले. तेव्हा आयुष्मान कार्ड चालणार नाही. रेशनकार्ड लागेल, असे सांगण्यात आले. रेशनकार्ड देण्यात आले. तेव्हा यात नाव चुकीचे आले असून, तहसीलदार प्रमाणपत्र आणण्याची सूचना करण्यात आली.
केस-३जिल्हा सत्र न्यायालय परिसरातील रुग्णालयातील योजनेच्या कक्षात मोफत उपचारासंदर्भात आवश्यक कागदपत्रांची माहिती विचारण्यात आली. तेव्हा आयुष्मान कार्ड, रेशनकार्ड अथवा तहसीलदार प्रमाणपत्र लागेल, असे सांगण्यात आले.
जिल्ह्यात योजनेशी संलग्नित रुग्णालयांची संख्या-५४
तक्रार करावीयोजनेअंतर्गंत उपचार घेण्यासंदर्भात गाइडलाइन देण्यात आलेल्या आहेत. रुग्णांची काही तक्रार असल्यास त्यांनी तक्रार करावी.- डाॅ. रामेश्वर कुंभार, जनरल मॅनेजर ऑपरेशन्स, ‘एमजेपीजेएवाय’
योजनेसाठी लाभार्थी... गट अ : पिवळी, अन्नपूर्णा अन्नयोजना आणि केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबे. गट ब : शुभ्र शिधापत्रिकाधारक कुटुंबे (शासकीय, निमशासकीय कर्मचारी यासह). कोणत्याही प्रकारची शिधापत्रिकाधारक नसलेली कुटुंबे.गट क : शासकीय अथवा शासनमान्य आश्रमशाळेतील विद्यार्थी, शासकीय किंवा शासनमान्य अनाथ आश्रमातील मुले, महिला आश्रमातील महिला, वृद्धाश्रमातील ज्येष्ठ, पत्रकार व त्यांच्यावर अवलंबून असलेली कुटुंबे, बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणीकृत, महाराष्ट्र राज्याबाहेरील रहिवासी असलेले बांधकाम कामगार व त्यांचे कुटुंब. गट ड : महाराष्ट्र सीमा भागातील रस्ते अपघातात जखमी झालेले, महाराष्ट्राबाहेरील व देशाबाहेरील रुग्णांना आरोग्य संरक्षण हे प्रतिरुग्ण प्रतिअपघात एक लाख एवढे राहील व १८४ उपचार लागू राहतील.गट इ : महाराष्ट्र, कर्नाटक सीमा भागातील, कर्नाटक राज्यातील मराठी भाषिक ८६५ गावांतील अन्नपूर्णा अन्न योजना, अंत्योदय, अन्न योजना शिधापत्रिकाधारक.
उपचार घेण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक? ‘गट अ’ ते ‘गट क’पर्यंतच्या लाभार्थ्यांना आयुष्मान कार्ड किंवा वैध फोटो ओळखपत्रासह संबंधित शिधापत्रिका, शुभ्र शिधापत्रिका नसल्यास, स्वयं-घोषणापत्रासह अधिवास प्रमाणपत्र किंवा तहसीलदार प्रमाणपत्र आणि वैध फोटो ओळखपत्र, शासकीय/निमशासकीय कर्मचारी असल्यास, स्वयं-घोषणापत्रासह शुभ्र शिधापत्रिका आणि वैध फोटो ओळखपत्र, संबंधित संस्थेने निर्गमित केलेले वैध ओळखपत्र आणि वैध फोटो ओळखपत्र देणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात अनेक ठिकाणी आयुष्मान कार्ड असल्यानंतरही शिधापत्रिका, तहसीलदार प्रमाणपत्राची सक्ती केली जाते.