छत्रपती संभाजीनगर : डी.एड.चे शिक्षण घेतल्यानंतर युवकांना शिक्षकाची नोकरी मिळेल, अशी कोणतीच शाश्वती नसल्यामुळे डी.एड. अभ्यासक्रमांची महाविद्यालये बंद पडू लागली आहेत. मागील दहा वर्षांत फक्त दोनदाच राज्य शासनाने शिक्षकांची भरती केली आहे. त्यामुळे डी.एड. झालेले हजारो युवक नोकरीच्या शोधात आहेत. त्याचा परिणाम म्हणून सध्या सुरू असलेली डी.एड. महाविद्यालयेही शेवटची घटका मोजत आहेत.
जिल्ह्यात डी.एड. महाविद्यालये २९जिल्ह्यात चालू शैक्षणिक वर्षात एकूण २९ महाविद्यालये सुरू आहेत. त्यामध्ये शासकीय अध्यापक महाविद्यालयांची संख्या ३ एवढी आहे. तर अनुदानित महाविद्यालय एक आहे. तसेच खासगी २५ महाविद्यालयेही कार्यरत आहेत. चालू शैक्षणिक वर्षात एक महाविद्यालय बंद पडले.
दहा वर्षांत अनेक महाविद्यालये बंदजिल्ह्यात मागील दहा वर्षांमध्ये अनेक डी.एड. महाविद्यालये बंद पडली आहेत. १० वर्षांपूर्वी जिल्ह्यात ८५ पेक्षा अधिक महाविद्यालये कार्यरत होती. ती आता २९ पर्यंत आली आहेत.
एकूण जागा २ हजार, रिक्त ९००जिल्ह्यातील २९ महाविद्यालयांमध्ये २ हजार जागा उपलब्ध आहेत. चालू शैक्षणिक वर्षात त्यातील ११०० जागांवर प्रवेश झाला. रिक्त जागांचा आकडा ९०० एवढा आहे. द्वितीय वर्षाला २ हजारपैकी १ हजार १५० एवढे प्रवेश झाल्याची माहिती जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य व्ही.आर. कांबळे यांनी दिली.
दहा वर्षांत दोनदाच शिक्षकांची भरतीराज्यात २०१४-२४ या दहा वर्षांच्या कालावधीत २०१९, २०२४ मध्ये शिक्षकांची भरती केली. तरीही शिक्षकांच्या हजारो जागा रिक्त आहेत. तसेच बिंदूनामावलींमध्ये सतत होणाऱ्या बदलांमुळे शिक्षकांच्या संख्येत वेगाने घट होत आहे.
युवकांना संधीची कमतरतापूर्वी डी.एड. केल्यानंतर नोकरी मिळत होती. पण आता नोकरीची हमी राहिलेली नाही. खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळेतही डी.एड.ची मुले मराठी माध्यमाची असल्यामुळे संधी मिळत नाही. खासगी शिकवणी वर्ग घेणाऱ्यांची संख्या भरपूर आहे. परंतु अत्यल्प वेतन असल्यामुळे डी.एड. झालेल्या मुलांना समाधानकारक काम करणे कठीण बनले आहे. त्याशिवाय या क्षेत्रात स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध नाही. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व नसल्यामुळे दुसऱ्या देशात शिक्षकाची नोकरी करण्याची संधी मिळत नाही.- व्ही.आर. कांबळे, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था