औरंगाबाद : वक्फ बोर्डाच्या जमिनींची राजरोसपणे खरेदी-विक्री सुरू आहे. अनेक जमिनींवर भूमाफियांनी अवैधरित्या कब्जा करून ठेवला आहे. वक्फच्या जमिनी परत मिळविण्यासाठी मंडळातर्फे धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी बिडकीन परिसरातील शेकटा येथे मशिदीच्या साडेआठ एकर जमिनीचा ताबा घेण्यात आला. यापुढेही जमिनी ताब्यात घेण्याची मोहीम सुरूच राहणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिस शेख यांनी सांगितले.
वक्फ बोर्डाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मशीद रांजणगाव खुरी, मौजे शेकटा येथील इनामी जमीन गट नं. १२०मध्ये ८ एकर ३९ गुंठे आहे. या जमिनीवर अनेक वर्षांपासून सूर्यभान पवार, किशोर बद्री भवार, विष्णू श्रीपती भवार, बारकू श्रीपती भवार, बरिगाबाई भवार, शिवाजी भवार व अशोक बर्वे रा. सर्व शेकटा यांनी अनधिकृतपणे ताबा घेतला होता. मशिदीचे मुतव्वली शेख नासिर व इतर यांनी वक्फ अधिनियम १९९५चे कलम ५४ अन्वये मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे अतिक्रमण काढण्याबाबत प्रकरण दाखल केले होते. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सुनावणी घेऊन ३० डिसेंबर २००६ रोजी निर्णय दिला की, जमीन मशिदीची आहे. या आदेशाला सूर्यभान भवार मयत यांचे वारसदार सुखदेव भवार व इतर यांनी औरंगाबाद येथील वक्फ न्यायाधिकरण येथे दावा दाखल केला.
न्यायाधिकरणाने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या आदेशास २० ऑक्टोबर २००९ रोजी योग्य असल्याचा निर्वाळा दिला. संबंधितांनी खंडपीठात धाव घेतली. खंडपीठाने २६ एप्रिल २०१६ रोजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा आदेश कायम ठेवला. २०१८मध्ये मुतव्वलीतर्फे न्यायालयात अवमान याचिका दाखल केली. त्या अनुषंगाने महसूल विभागास कारवाई करण्यास बजावले. त्यानुसार वक्फ बोर्डाने शुक्रवारी मंडल अधिकारी, लोहगाव, तलाठी, पोलीस यांच्या मदतीने जागेचा ताबा घेतला. यावेळी वक्फ मंडळाचे जिल्हा वक्फ अधिकारी सय्यद फैज, मशिदीचे मुतव्वली इनामदार शेख नासिर यांच्याकडे ताबा देण्यात आला.