औरंगाबाद : इतिहासात पहिल्यांदाच वक्फ मंडळाने जमिनी हडपणाऱ्या भूमाफियांच्या (Waqf board land scam) विरोधात मोहीमच उघडली आहे. राज्यात आत्तापर्यंत १६ गुन्हे दाखल करण्यात आले. त्यात एकट्या बीड जिल्ह्यात ७ गुन्हे नोंद झाले. अनेक भूखंड गैरव्यवहारात महसूलच्या अधिकाऱ्यांचाच हात असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. अलीकडेच वक्फने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र पाठवून तुमच्या अधिकाऱ्यांना आवरा, असे आवाहन केले होते. या पत्राला आता बळकटी मिळत आहे.
वक्फ बोर्डातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही वर्षांमध्ये वक्फशी संबंधित अनेक जमिनींचा गैरव्यवहार करण्यात आला. जमिनी खालसा करून अवैध खरेदी -विक्री करणे, बोगस दस्तऐवज तयार करून शासन अधिग्रहित जमिनींचा मोबदला लाटणे, अवैधपणे वक्फ मालमत्ता भाडेकराराने देणे, अशी अनेक प्रकरण समोर आली आहेत. या प्रत्येक प्रकरणात मुतवल्लीसोबत महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचा मोठा सहभाग उघडकीस येत आहे. फक्त बीड जिल्ह्यात ३ प्रकरणांत वक्फ जमीन खालसा करण्यात बीड येथील तत्कालीन भूसुधार उपजिल्हाधिकारी एन. आर. शेळके आरोपी आहेत. यासोबतच भूसुधार उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव पाटील, उपविभागीय अधिकारी अभिमन्यू रंगनाथ बोदवड, तहसीलदार तसेच कर्मचाऱ्यांचा सहभाग उघडकीस आला आहे.
कोट्यवधी रुपयांच्या जमिनी-नितरुड (ता. माजलगाव) येथील मशीद दरगाची ४४ एकर जमीन बेकायदेशीर खालसा करण्याचा प्रकार समोर आला. यात येथील तत्कालीन उपजिल्हाधिकारी व सध्याचे उपविभागीय अधिकारी यांनी तर चक्क वक्फ जमीन खालसा करून पत्नी, भाऊ व बहिणीच्या नावे खरेदी केली. या प्रकरणात दहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या जमिनीची किमत कोट्यवधीत आहे.-बीड शहरातीलच मशीद सारंगपूर पंचवीस हेक्टर ३८ गुंठे जमीन खालसा करण्याच्या प्रकरणीही तत्कालीन उपजिहाधिकारी, मंडल अधिकारी व तलाठी यांच्यावर गुन्हे दाखल आहेत.-बहुचर्चित दरगा हजरत सय्यद सुलेमान मशीदची १ एकर ८ गुंठे जमीन वक्फ मिळकतीच्या महसुली अभिलेखात स्वतःचे नाव नोंदवणाऱ्या शेख निझाम शेख जैनीद्दीन व शेख जैनोद्दीन शेख सुजओद्दीन यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.-पुणे जिह्यातील ताबूत इनाम इण्डोमेन्ट ट्रस्टच्या पाच हेक्टर जमिनीच्या बोगस एनओसीप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. या जमिनीची किंमत तब्बल ७ कोटी ७७ एवढी लाख आहे.