औरंगाबाद : शहरातील जालनारोडवर नियमबाह्यपणे काही व्यापाऱ्यांना वक्फ बोर्डाची जागा देण्यात आली आहे. या प्रकरणात आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू केले असतानाच ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील वक्फ बोर्डाच्या एका जागेला चक्क बोगस ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) दिल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र यासंदर्भात मागील सहा महिन्यांमध्ये वक्फ बोर्डाने कोणतीही कारवाई केलेली नाही. बोर्डातील काही कर्मचाऱ्यांच्या मदतीने बोगस ‘एनओसी’ देणारे रॅकेट कार्यरत असल्याचा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत केला.
बदलापूर येथील डॉ. कृष्णा निमसाखरे यांनी जामा मशीद ट्रस्टकडून जागा घेतली. ट्रस्टच्या मंडळींना कोट्यवधी रुपये दिले. त्यानंतर त्यांना ‘एनओसी’साठी औरंगाबाद येथील वक्फ कार्यालयात यावे लागले. येथे उस्मानाबाद येथील एका प्रतिष्ठित वकिलाने त्यांना ‘एनओसी’ मिळवून देण्याचे आश्वासन दिले. या कामासाठी वकिलाने तब्बल नऊ लाख रुपयांची मागणी केली. लाॅकडाऊनच्या काळात निमसाखरे यांना बदलापूरवरून उस्मानाबादला जाणे शक्य नव्हते त्यामुळे वकिलाने नऊ लाख रुपये ‘आरटीजीएस’ करून मागून घेतले. त्यानंतर वकिलाने त्यांना एक ‘एनओसी’ दिली. माहिती अधिकारात वक्फ बोर्डाने ‘एनओसी’ आमच्या कार्यालयातून देण्यात आलेली नसल्याचा निर्वाळा डॉ. निमसाखरे यांनी दिला आहे. नोव्हेंबर २०२०मध्ये बोगस ‘एनओसी’चा प्रकार समोर आल्यानंतरही वक्फ बोर्डाने कोणतीही कारवाई केलेली नाही. निमसाखरे यांनी औकाफमंत्री नवाब मलिक यांच्याकडे रितसर तक्रार दाखल केलेली आहे.
या तक्रारीत वेळोवेळी शासकीय यंत्रणेने आपल्याला कशा पद्धतीने लुटले याची माहिती त्यांनी दिली आहे. या सर्व प्रकारानंतर आता संबंधित वकील निमसाखरे यांना सर्व रक्कम परत देण्यास तयार झाला आहे. निमसाखरे यांनी स्वतः पोलिसांत तक्रार द्यावी यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे खासदार जलील यांनी सांगितले.