औरंगाबाद : ‘युद्ध किंवा रणांगण म्हणजे मृत्यू नव्हे. असा समज असलेले समीकरण बाजूला सारण्याची गरज आहे. मी स्वतः १९७१ च्या युद्धात चीनच्या सीमेवर तोफखान्याचा प्रमुख म्हणून काम पाहिले. आज माझ्यासारखे सैनिक तुमच्यासमोर उभे आहेत. त्यामुळे पालकांसह विद्यार्थ्यांनी मनामध्ये शंका न बाळगता भारतीय सेनेत सामील व्हावे. ती देशसेवा म्हणजे सर्वोच्च मान मी समजतो,’ असे मत कॅप्टन सुरेंद्र सुर्वे यांनी व्यक्त केले.
कारगिल विजय दिनानिमित्त गारखेड्यातील कारगिल स्मृतिवनात आयोजित अभिवादनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षीय भाषणात आ. अतुल सावे म्हणाले, कारगिल युद्धात आहुती देणाऱ्या ५२७ जवानांना आणि देशाच्या रक्षणासाठी शहीद झालेल्या सर्व जवानांमुळे आज आपण इथे सुरक्षित आहोत. त्यांच्या स्मरणार्थ औरंगाबाद येथे स्मृतिवन उभारण्यात आले आहे. सर्वांच्या पुढाकाराने स्मृतिवनाचे रूपांतर स्मारकात व्हायला हवे. कारगिल स्मृतिवन समितीचे पंकज भारसाखळे यांनी प्रस्तावना केली. यावेळी विद्यार्थी आणि परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती. राष्ट्रगीतानंतर ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’ आणि ‘जय जवान, जय किसान’ या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. कार्यक्रमाची सांगता ‘कारगिल शहीद जवान, अमर रहे अमर रहे’ या घोषणेने झाली.
यावेळी कारगिल स्मृतिवन समितीचे निवृत्त पोलीस अधीक्षक वैजनाथ केंद्रे, गंगाधर शेवाळे, अर्जुन गवारे, अप्पा हुळमजगे, डॉ. उदय डोंगरे, भिकन आंबे, प्राचार्य संध्या काळकर, प्राचार्य सपकाळ, प्राचार्य प्रकाश नागरे, राजाराम मोरे, प्रा. गोविंद केंद्रे, कैलास वाहुळे, जसवंतसिंह राजपूत, भास्कर दवंडे, माजी सैनिक संघटनेचे सुभेदार मेजर काशीनाथ पवार, अप्पाजी फुलम्हस्के, पोपटराव नारायण, गजानन पिंपळे, कपिल राऊत, साहेबराव शिंदे, गोपीनाथ कोल्हे, सुदाम साळुंके, रामेश्वर टेहरे, उमाकांत रत्नपारखी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृत बिऱ्हाडे यांनी केले. जगदीश चव्हाण यांनी आभार मानले.
फोटो ओळ : कारगिल विजय दिनानिमित्त गारखेड्यातील कारगिल स्मृतिवन उद्यानात ‘अमर जवान स्तंभाला’ अभिवादन करताना कॅप्टन सुरेंद्र सुर्वे, आ. अतुल सावे, पंकज भारसाखळे यांच्यासह माजी सैनिक व परिसरातील नागरिक दिसत आहेत.