औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा दिवस जवळ येत असतानाच विविध पक्षांच्या उमेदवारांचा सर्व पातळ्यांवरील प्रचाराने वेग घेतला आहे. प्रमुख उमेदवारांनी समाज माध्यमांवर प्रचार करण्यासाठी स्वतंत्र वॉर रूम तयार केल्या आहे. या वॉर रूममध्ये रात्रंदिवस कार्यरत राहण्यासाठी व्यावसायिक व्यक्तीसह कार्यकर्त्यांची नेमणूक केली असल्याचे पाहणीत आढळून आले.
राष्ट्रीय, राज्यस्तरीय पक्षांनी समाज माध्यमांवर प्रचार करणारी यंत्रणा दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत उभारली आहे. यात फेसबुक, व्हॉटस्अॅप, व्टिटर आदींच्या माध्यमातून आपल्या पक्षाच्या उमेदवारांची, पक्षाची चांगली बाजू व्हायरल केली जाते. याचवेळी विरोधी पक्षातील नेते, उमेदवारांच्या चुकीच्या गोष्टी समाज माध्यमातून जास्तीत जास्त शेअर करण्यावरही कार्यकर्त्यांसह विविध कंपन्यांकडून सेवा घेतलेल्या यंत्रणेचा भर आहे.
औरंगाबाद लोकसभा निवडणुकीसाठी मैदानात उतरलेल्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराने सोशल मीडियात वर्चस्व निर्माण करण्यासाठी पोस्टर, व्हिडिओ, बॅनर तयार करून निवडणूक आयोगाकडून परवानगी घेणे, विविध वर्तमानपत्रांमध्ये आलेल्या बातम्या, पक्षाच्या प्रचार सभा, रॅली, कॉर्नर बैठकांचे छायाचित्रे फेसबुक, व्हॉटस्अॅपवर प्रसारित करण्याचे काम केले. दुसऱ्या दिवशीचे नियोजन आदल्या दिवशीच पूर्ण केले जाते.
दुसऱ्या दिवशी नियोजन केलेल्या प्रत्येक गोष्टीची अंमलबजावणी करण्यात येते. यासाठी ४० पेक्षा अधिक जणांची टीम कार्यरत आहे. या टीमचे नेतृत्व उमेदवार आ. सुभाष झांबड यांचा मुलगा संदेश झांबड करत आहेत. शिवसेनेचे उमेदवार खा. चंद्रकांत खैरे यांचाही सोशल मीडियात प्रचार करण्यासाठी मध्यवर्ती कार्यालयातच वॉर रूम तयार करण्यात आलेली आहे. या वॉर रूमच्या माध्यमातून सर्व शिवसैनिक, पदाधिकाऱ्यांशी समन्वय साधणे, पक्षांच्या कॉर्नर बैठका, जाहीर सभांचे छायाचित्रे शिवसैनिकांनी व्हॉटस्अॅपवर तयार करण्यात आलेल्या २५० ते ३०० ग्रुपच्या माध्यमातून प्रसारित करण्यात येतात.
फेसबुकवरही पक्षाच्या उमेदवारांचे अधिकृत पेज तयार केले आहे. त्यावर जाहिरात प्रसारित करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून परवानगी घेण्यात आली असून, नियोजनबद्धपणे सोशल मीडियात प्रचार केला जात आहे. तसेच शिवसेनेच्या मुंबईतील मध्यवर्ती कार्यालयाकडून आलेले व्हिडिओ, सभांची छायाचित्रेही शेअर करण्याचे काम ही वॉर रूम करते. या वॉर रूमचे नेतृत्व कट्टर शिवसैनिक मच्छिंद्र सोनवणे हे करत आहेत. त्यांच्या सोबतीला ८ ते १० जणांचा स्टाफही देण्यात आला असल्याचे वॉर रूमला भेट दिल्यानंतर समजले.
अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्याही प्रचार कार्यालयातच वॉर रूम बनविण्यात आली आहे. या वॉर रूमची सर्व भिस्त ही आठ जणांवर आहे. कॉर्नर बैठका, सभांची छायाचित्रे, उमेदवारांतर्फे करण्यात येणारी विविध कामांची माहिती ही टीम प्रसारित करण्याचे काम करत असल्याचे उपस्थितांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. एमआयएम व बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील यांचीही वॉर रूम कार्यरत आहे. एमआयएमचे शहरप्रमुख वॉर रूम आणि सोशल मीडियाची जबाबदारी सांभाळत असल्याचे आ. जलील यांनी सांगितले. वंचित बहुजन आघाडीकडे सोशल मीडियावर स्वयंस्फूर्तपणे पोस्ट तयार करणे, शेअर करणारी मोठी यंत्रणा असल्याचे संबंधितांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.