पैठण : एकीकडे सूर्य मावळतीला जात असताना दुसरीकडे नाथ मंदिरात भानुदास एकनाथच्या जयघोषात टाळ मृदंगाच्या खणखणाटात षष्ठी महोत्सवाची काला दहिहंडी नाथवंशज ह.भ.प. रावसाहेब महाराज गोसावी यांच्या हस्ते फोडण्यात आली. गुरुवारी सायंकाळी काल्याचा प्रसाद व नाथ समाधीचे दर्शन घेऊन वारकरी तृप्त मनाने परतीच्या मार्गावर चालते झाले. दरम्यान, आज नाथषष्ठीस आलेल्या वारकऱ्यांनी विविध फडावर काल्याचे कीर्तन केले. फडावरच दहीहंडी फोडली, महाप्रसादाचे वाटप केले अन् पैठणनगरीचा निरोप घेतला.गुरुवारी सायंकाळच्या सुमारास मानाची नाथवंशजांची काला दिंडी गावातील नाथ मंदिरातून काढण्यात आली. पालखी ओटामार्गे वाळवंटातून दिंडी नाथ मंदिरात नेण्यात आली. दरम्यान, कृष्ण दयार्णव महाराज यांची दिंडीही मंदिरात दाखल झाली. त्याचवेळी दक्षिण दरवाजातून ह.भ.प. अंमळनेरकर महाराज यांचीही दिंडी नाथ मंदिरात दाखल झाली. मंदिरात भाविकांनी रिंगण करून पावल्या खेळल्या तर महिला भाविकांनी फुगड्या खेळून सेवा अर्पित केली.‘भानुदास एकनाथ’च्या गजरात वारकरी व भाविकांसह खेळलेल्या पावल्यामुळे मंदिरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी हजारो महिला भाविकांनी सजवलेल्या कलशातून दहीहंडीचा प्रसाद करून आणला होता. दहिहंडीचा प्रसाद फुटताच मंदिरात भाविकांनी एकमेकांना काल्याच्या प्रसाद वाटला. नाथषष्ठी महोत्सवासाठी पैठणनगरीत गेल्या तीन दिवसांपासून मुक्कामी असलेल्या विविध फडावरील दिंडीप्रमुखांनी आपापल्या फडावर काल्याचे कीर्तन करून दुपारीच पैठणनगरीचा निरोप घेतला. वारकऱ्यांना निरोप देताना आज पैठणकरांना मात्र भरून येत होते.छबिना मिरवणूकबुधवारी रात्री १२ वाजता गावातील नाथ मंदिरातून नाथ महाराजांच्या पादुकांची छबिना पालखी मिरवणूक काढण्यात आली. पालखीत मोठ्या संखेने वारकरी सहभागी झाले होते. ठिकठिकाणी या पालखीवर नागरिकांनी पुष्पवृष्टी केली. पालखी गोदावरीच्या भेटीस नेण्यात आली व पुन्हा नाथ मंदिरात नेण्यात आली.काला दहीहंडीचे स्क्रीनवर प्रक्षेपणकाला दहिहंडी सोहळा डोळ्यात साठविण्यासाठी भाविकांची विक्रमी गर्दी झाली होती. मोठ्या संख्येने दिंड्या यंदा काला दहिहंडीसाठी थांबल्याने गर्दीत वाढ झाली. यामुळे नगर परिषदेच्या वतीने प्रांगणात चार एलसीडी स्क्रीन लाऊन दहीहंडीचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले. यामुळे काल्यासाठी आलेल्या हजारो भाविकांना दहिहंडी सोहळ्याचा लाभ घेता आला.पैठण शहर झाले सुने सुनेवारकºयांचे तीन दिवसांपासून पैठणनगरीत असलेले वास्तव्य, संत -महंतांचे कीर्तन, भजन, दिंड्या, फड, राहुट्या, टाळ, मृदंग यासह भानुदास एकनाथाच्या गजराने पैठणनगरी गजबजून गेली होती. अनेक वर्षांपासून सातत्याने येणाºया वारकºयांचे येथील नागरिकांशी अध्यात्मिक नाते गुंफले गेले असून यातून मोठा स्नेह निर्माण झालेला आहे. आज वारकºयांचे पैठणनगरीतून प्रस्थान झाल्याने शहरातील हरिनामाचा गजर थंडावला. यामुळे येते दोन -तीन दिवस पैठणकरांना सुने सुने वाटणार आहे.रेवडेबाजी प्रथा बंदनाथ मंदिरात काला हंडी फोडण्यासाठी रेवड्या घेऊन येण्यास प्रतिबंध करण्यात आल्याने मंदिरात कालाहंडी सोहळा आबालवृद्धांना शांतपणे अनुभवता आला. काला दहिहंडीसाठी अनेक भाविक मंदिरात रेवडी घेऊन येत होते. कीर्तन सुरु असताना या रेवड्यांची उधळन करण्याची प्रथा होती. यातून मंदिरात आलेल्या भाविकांना रेवडीरूपी प्रसादाचा लाभ होत होता. अलिकडे या प्रथेस काही भाविकांनी रेवड्या उधळण्याऐवजी त्या फेकून मारण्याची विकृती सुरु केली होती. यंदा मात्र दुपारपासूनच पोलिसांनी रेवड्या विक्रीवर बंधन आणून मंदिरात रेवड्या घेऊन जाण्यास प्रतिबंध केला. अप्पर पोलीस अधीक्षक गणेश गावडे, उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड, पोनि. भागवत फुंदे, पोनि. भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
काल्याचा महाप्रसाद घेऊन वारकरी निघाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 12:08 AM