बीड : पंढरपूरच्या वाटेवरील वारकऱ्यांची तर सारेच सेवा करतात. परंतु परतीच्या मार्गावर वारकऱ्यांची गैरसोय होते. त्यांच्या सेवेच्या उद्देशाने ११ वर्षांपासून येथील वारकरी सेवा प्रतिष्ठानतर्फे बसस्थानकात सायंकाळपासून ते सकाळपर्यंत अन्नछत्र सुरू करण्यात आले. यंदाही हा उपक्रम मोठ्या जोमात सुरु असून, शेकडो हात वारकरी सेवेत व्यस्त आहेत.१५ ते १७ जुलै या कालावधीत राबवण्यात आलेल्या या उपक्रमात बसस्थानक परिसरातील छोटे-मोठे व्यावसायिक, पोलीस कर्मचारी, काही व्यापारी मंडळ, एसटीचे काही कर्मचारी, भारवाहक या साऱ्या मंडळींनी वर्गणी करु न निधी उभारला होता. पहिल्या दिवशी साबुदाणा खिचडी, पेढे देण्यात आले. शनिवारी पोहे, शिरा तर शेवटच्या दिवशी जिलेबी, पोह्याचा मेनू होता. सोबत चहापानाची व्यवस्था होती. पंढरपूरहून रात्री-अपरात्री येणाऱ्या प्रवाशांना यामुळे दिलासा मिळाला आहे. बीडकर तरुण मोठ्या आग्रहाने ‘या माऊली, म्हणत सरबराई करीत असल्याने थकून आलेले वारकरीही भारावून गेले. (प्रतिनिधी)
वारकऱ्यांची सरबराई
By admin | Published: July 18, 2016 12:38 AM