औरंगाबाद : महापालिकेच्या सातव्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारुप प्रभाग रचनेचा आराखडा व प्रभागांच्या हद्दींचा नकाशा महापालिकेतर्फे गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आला. आराखडा आणि नकाशावर नागरिकांना सूचना आणि हरकती घेण्यासाठी १६ जूनपर्यंत अवधी दिला आहे. आराखडा प्रसिद्ध होताच महापालिका मुख्यालयात इच्छुक उमेदवारांसह नागरिकांनी गर्दी केली होती.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार गुरुवारी मनपाने प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा आणि प्रभागांच्या हद्दींचा नकाशा प्रसिद्ध केला. महापालिकेच्या मुख्यालयात अतिरिक्त आयुक्त बी.बी. नेमाने, निवडणूक विभागाचे प्रमुख तथा उपायुक्त डॉ. संतोष टेंगळे यांनी सूचना फलकावर आराखडा आणि नकाशा लावला. त्याशिवाय पालिकेच्या टप्पा क्रमांक तीन इमारतीच्या प्रवेशद्वारावरदेखील तो लावण्यात आला.
आराखड्यासंदर्भात अधिक माहिती देताना उपायुक्त तथा निवडणूक विभागप्रमुख डॉ. संतोष टेंगळे म्हणाले, महापालिकेने २७ मे २०२२ रोजी राज्य निवडणूक आयोगाकडे प्रारूप आराखडा सादर केला होता, त्याला आयोगाने मान्यता दिली. आयोगाच्या आदेशानुसार प्रभागांचा प्रारूप आराखडा आणि हद्दींचा नकाशा प्रसिद्ध करण्यात आला. प्रसिद्ध करण्यात आलेल्या आराखडा व नकाशावर सूचना- हरकती घेण्यासाठी आयोगाने वेळापत्रक ठरवून दिले आहे. त्यानुसार २ ते १६ जूनदरम्यान या अधिसूचनेवर नागरिकांना हरकती- सूचना घेता येतील.
महापालिकेच्या निवडणूक विभागात त्या स्वीकारल्या जाणार आहेत. प्राप्त झालेल्या हरकती-सूचनांचे विवरण पत्र १७ जूनला राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केले जाणार आहे. निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यामार्फत २४ जूनला हरकती व सूचनांवर सुनावणी होईल. सुनावणीनंतर प्राधिकृत अधिकाऱ्यांनी केलेल्या शिफारशी ३० जूनपर्यंत राज्य निवडणूक आयोगास पाठवल्या जातील. प्रभाग रचनेचा नकाशा, हद्दी, व्याप्ती व वर्णन याचे नकाशे सर्व झोन कार्यालये व महापालिकेच्या संकेतस्थळावर नागरिकांना माहितीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे डॉ. टेंगळे यांनी सांगितले.
नवीन प्रभाग रचनेचा तपशील : - सदस्यसंख्या (वॉर्डांची संख्या) – १२६- प्रभागांची संख्या – ४२- लोकसंख्या – १२,२८,०३२- अनुसूचित जाती प्रवर्गाची लोकसंख्या – २,३८,१०५- अनुसूचित जमाती प्रवर्गाची लोकसंख्या – १६,३२०- एका प्रभागाची सरासरी लोकसंख्या – २९,२३९- अनुसूचित जातीं प्रवर्गासाठी आरक्षित वॉर्ड – २४- अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित वॉर्ड – १२- अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षित वॉर्ड – ०२- अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित वॉर्ड – ०१- एकूण सदस्यसंख्येच्या (वॉर्डांच्या) प्रमाणात महिलांसाठी आरक्षण – ६३- सर्वसाधारण प्रवर्गासाठीचे वॉर्ड – १००- सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित वॉर्ड – ५०