औरंगाबाद : राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार मनपाच्या निवडणूक विभागाने प्रभाग रचना तयार करण्याचे काम सुरू केले. अचानक उपायुक्त मंजूषा मुथा यांनी सर्व कामकाज आपल्याकडे मागवून घेतले. त्यामुळे विद्यमान १० पेक्षा अधिक दिग्गज नगरसेवक डेंजर झोनमध्ये अडकण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. १९ नोव्हेंबरच्या सर्वसाधारण सभेत प्रभाग रचनेचा स्फोट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा २१ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि मनपा आयुक्त असलेल्या समितीला सादर करावयाचा आहे. आराखडा तयार करण्यासाठी अवघे चारच दिवस शिल्लक आहेत. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने आराखड्याला मंजुरी देताच २७ नोव्हेंबरला राज्य निवडणूक आयोगाकडे कोणत्याही परिस्थितीत आराखडा पाठवावा लागणार आहे. पंधरा दिवसांपूर्वी मनपाच्या निवडणूक विभागात चार स्वतंत्र अधिकारी व कर्मचारी या कामासाठी नियुक्त करण्यात आले.
मनपाचे अधिकारी विद्यमान नगरसेवकांच्या सोयीनुसार प्रभाग रचना तयार करतील, अशी शंका उपायुक्त मंजूषा मुथा यांना आली. त्यांनी कर्मचाऱ्यांकडून दोन वेगवेगळे प्रारूप आराखडे तयार करून घेतले. त्यानंतर सर्व कामकाज आपण बघणार असल्याचे सांगितले. अंतिम आराखडा नेमका कसा तयार होतो हे आता मनपा कर्मचाऱ्यांनाही माहीत नाही. स्वत: उपायुक्त मुथा हा आराखडा तयार करणार असल्याचे बोलले जात आहे. या सर्व प्रक्रियेमुळे मनपातील सत्ताधारी आणि विद्यमान नगरसेवक कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. प्रत्येकाला आपल्या सोयीनुसार प्रभाग हवा आहे. नियमानुसार असे करता येत नाही. नियमानुसार प्रभाग रचना करायची म्हटले तर दहापेक्षा अधिक दिग्गज नगरसेवक मोठ्या संकटात सापडणार आहेत. पुन्हा सभागृहात येण्याचे त्यांचे स्वप्न भंगणार आहे. सत्ताधारी, नगरसेवकांमधील खदखद आता हळूहळू वाढू लागली आहे. १९ नोव्हेंबरला तातडीची सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे. वेगळ्या पद्धतीने याचा स्फोट होण्याची शक्यता मनपा वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे.
एकाच वॉर्डात अनेक मातब्बरप्रभाग रचना नियमानुसार करायची म्हटले तर जालना रोडजवळील एका प्रभागात तीन मातब्बर नगरसेवक येत आहेत. प्रभागातील चार वॉर्डांमधील दोन महिलांसाठी राखीव राहील. एक अनुसूचित जातीसाठी राखीव होणार आहे. उरलेल्या एकाच खुल्या प्रवर्गातील वॉर्डात तीनपेक्षा अधिक मातब्बर एकमेकांच्या विरोधात निवडणूक कशी काय लढवू शकतील? हा संभाव्य धोका लक्षात घेऊन मातब्बराची अक्षरश: झोपच उडाली आहे.