औरंगाबाद : औरंगाबाद महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेविषयी पुढील आदेशापर्यंत जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवार दि. ६ रोजी दिले. सर्व प्रतिवादींना नोटिसा बजावण्याचेही आदेश न्यायालयाने दिले.
महापालिकेच्या प्रभाग रचेनविषयी समीर राजूरकर व इतर यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या विशेष अनुमती याचिकाची सुनावणी मंगळवारी मुख्य न्यायमूर्ती शरद बोबडे, न्या. एस. बोपन्ना आणि न्या. व्ही. रामासुब्रमण्यम यांच्या खंडपीठासमोर झाली. सुनावणीअंती न्यायमूर्तींनी जैसे थे चा आदेश दिला.
महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेबाबत नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर आक्षेप सादर केले होते. या आक्षेपांवर आयुक्त सौरभ राव यांच्या समितीने सुनावणी घेतली.
त्यानंतर राज्य निवडणूक आयुक्त यांनी अंतिम प्रभाग रचना व आरक्षणाचा मसूदा प्रसिद्ध केला होता. त्यानंतर औरंगाबाद खंडपीठासमोर समीर राजूरकर, अनिल विधाते, किशोर तुळशीबागवाले, नंदू गवळी यांनी याचिका सादर केल्या होत्या. मात्र खंडपीठाने या याचिका फेटाळल्यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका सादर केली होती.
याचिकेत महाराष्ट्र शासन, राज्य निवडणूक आयाेग, मनपा यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. मंगळवारी सर्वेाच्च न्यायालयासमोर याचिकाकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ डी. एस. कामत, डी. पी. पालोदकर, शशिभूषण आडगावकर यांनी काम पाहिले.