औरंगाबाद : मनपाच्या आर्थिक परिस्थितीचा हवाला देताना, तुम्ही वसुलीवर लक्ष दिले तरच मी तुमच्या वॉर्डात विकास करील असे प्रभारी मनपा आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी गुरुवारी एमआयएमच्या नगरसेवकांना स्पष्ट शब्दात सुनावले. आयुक्तांचे हे म्हणणे नगरसेवकांनाही पटल्याने त्यांनी लगेचच आपापल्या वॉर्डातील बड्या थकबाकीदारांची यादी देण्याची मागणी करून करवसुलीसाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. स्थानिक संस्था कर (एलबीटी) बंद झाल्यापासून मनपाची आर्थिक परिस्थिती हलाखीची बनली आहे. त्यात मालमत्ता कराच्या वसुलीचे प्रमाणही अत्यल्प आहे. म्हणून मनपा प्रशासनाने आता करवसुलीवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे, तर दुसरीकडे वॉर्डात विकासकामे होत नसल्यामुळे नगरसेवकांमध्ये नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर एमआयएमचे गटनेते नासेर सिद्दीकी, नगरसेवक फेरोज खान आणि इतर काही नगरसेवक गुरुवारी काही कामांची मागणी घेऊन प्रभारी आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे आले. त्यावर केंद्रेकर यांनी त्यांच्या कामांची माहिती घेतली. पण सोबत मनपाच्या आर्थिक परिस्थितीचीही त्यांना कल्पना दिली. पालिकेची आर्थिक परिस्थिती वाईट आहे. मालमत्ता कर हाच आता पालिकेचा आधार आहे. कर वसूल झाला तरच कामे होतील; परंतु दुर्दैवाने काही वॉर्डांमध्ये वसुलीचे प्रमाण अगदीच अत्यल्प आहे. त्यामुळे तुम्हाला विकासकामे हवी असतील तर आधी वसुलीवर लक्ष द्यावे लागेल. तुम्ही वसुलीवर लक्ष दिले तरच मी तुमच्या वॉर्डात कामे करील, असेही केंद्रेकर यांनी सुनावले. त्यानंतर फेरोज पटेल आणि इतर नगरसेवकांनी आम्ही वसुलीला सहकार्य करण्यासाठी तयार आहोत, असे सांगत वॉर्डात बड्या थकबाकीदारांच्या यादीची मागणी केली. तसेच वॉर्डातील काही व्यापारी गाळ्यांना अतिशय कमी कर आहे, त्यांना जास्तीचा कर लावा अशी सूचनाही केली. इतर नगरसेवकांनीही याच पद्धतीने करवसुलीला सहकार्य करण्याचे मान्य केले.
वसुलीवर लक्ष दिले तरच वॉर्डात कामे
By admin | Published: January 22, 2016 12:10 AM