औरंगाबाद : सकाळी ७ वाजेच्या दम्यान शांतीपुरा येथील मंडप गोदामाच्या मागील कचरा जाळण्यात येत असताना गोदामास भीषण आग लागली. यात गोदामातील साहित्याचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले असून अग्निशमन दलाच्या दोन बंबांनी आगीवर वेळीच नियंत्रण मिळवले.
शांतीपुरा भागात उमेश रानडे यांचे मंगल कार्यासाठी लागणाऱ्या मंडप साहित्याचे गोदाम आहे. आज सकाळी या गोदामाच्या मागे असलेला कचरा जाळन्यात येत होता. यातून गोदामाच्या मागील बाजूने पेट घेतला. ही बाब आजूबाजूच्या नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी छावणी पोलीस व अग्निशमन दलास याची माहिती दिली. यानंतर छावणी पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरु केले. दरम्यान मनपाच्या सिडको व पदमपुरा येथील अग्निशमन बंबांनी घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यत गोदामातील साहित्याचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले होते. प्राथमिक माहितीनुसार गोदामातील २० ते २५ लाखाचे साहित्य भस्मसात झाले आहे.