- रुचिका पालोदकर ।
औरंगाबाद : शाळेमुळे जसे ज्ञान मिळते, तशीच जीवनाकडे कलात्मक भूमिकेतून पाहण्याची दृष्टीही तयार होते. आपले ज्ञान मंदिर सुशोभीत करण्यासाठी आणि मुलांना पारंपरिक कला शिकण्याचा आनंद मिळवून देण्यासाठी कला शिक्षिका भारती ठाकरे यांनी गणोरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत एक अभिनव उपक्रम राबविला आणि अवघ्या शाळेच्या भिंतींवरच वारली चित्रकलेतील आकृत्या फेर धरून बागडू लागल्या.
जिल्हा परिषदेच्या शाळेतर्फे राबविण्यात आलेला हा उपक्रम सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. उन्हाळ्याच्या सुट्या असल्यामुळे सध्या मुलांक डे त्यांचे कलागुण जोपासण्यासाठी खूप वेळ आहे. हा वेळ सत्कारणी लावण्यासाठी एप्रिल महिन्याच्या अखेरीस ठाकरे यांनी चित्रकलेची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना सोबत घेतले, त्यांना वारली चित्रकला शिकवली, त्यांच्याकडून सराव करून घेतला आणि मग भिंतींवर वारली चित्रकला रेखाटण्याचे काम सुरू केले. जवळपास १५ दिवसांत त्यांनी शाळेच्या संपूर्ण आवारात चार- चार फूट भिंतींपर्यंत वारली चित्रकला रेखाटली आहे.
एप्रिल महिन्याच्या अखेरीस विद्यार्थी आणि शिक्षकांनी मिळून या कामाला सुरुवात केली. सकाळी ९ ते सायं. ५ अशी अखंडपणे ही मंडळी चित्रकलेत गढून गेलेली असायची. सुप्रिया शेळके, पायल पुसे, मोनिका पेहेरकर, भारती सपकाळ, प्राची गायकवाड, काजल सपकाळ, अश्विनी सपकाळ, कीर्ती चव्हाण, रूद्र सपकाळ, श्याम पुसे, कुचे या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी होऊन शाळा सुशोभीत केली.
वारलीतून रेखाटणार शैक्षणिक आकृत्या नव्या पिढीची आपल्या संस्कृतीसोबतची नाळ अधिक मजबूत करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता आहे. याचाच एक भाग म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला. वारली चित्रकला ही महाराष्ट्रातील कोकण विभागातील आदिवासी जमातीची वैशिष्ट्यपूर्ण चित्र शैली आहे. गेरूची पार्श्वभूमी असलेल्या भिंतींवर तांदळाच्या पीठाने साधे व सुबक आकार रंगविणे, हे या चित्रशैलीचे वैशिष्ट्य समजले जाते. ही पारंपरिक कला आदिवासींपुरती मर्यादित न राहता यातून कलावंत घडावेत आणि येणाऱ्या पिढ्यांना ही पारंपरिक कला समजावी, हा आमच्या शाळेचा प्रयत्न आहे. इतिहासातील घटना, भौमितिक आकृत्या, वैज्ञानिक रचना आदी प्रकारची शैक्षणिक वारली चित्रे विद्यार्थ्यांच्या मदतीने यापुढे चितारण्याचा मानस आहे.- भारती ठाकरे,कला शिक्षिका