औरंगाबाद: नाभिक समाजासह बारा बलुतेदार समाजाच्या विकासासाठी राज्य सरकारने तातडीने बारा बलुतेदार आर्थिक विकास महामंडळाची स्थापना न केल्यास राज्यभरात आंदोलनाचा भडका उडेल, असा इशारा नाभिक महामंडळाचे अध्यक्ष व बारा बलुतेदार महासंघाचे अध्यक्ष कल्याण दळे यांनी दिला आहे.
मौलाना आझाद संशोधन केंद्र मजनू हिल येथे ते नाभिक महामंडळाच्या राज्यस्तरीय बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
यावेळी बारा बलुतेदार आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यास अजिबात विलंब करू नये, असा एकमुखी ठराव संमत करण्यात आला.
दामोधर बिडवे, गणेश मोहिते, सुरेंद्र आवारे, उत्तम सोलाने, भगवान वाघमारे, किशोर सूर्यवंशी, संध्या पारवे आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन रेणुकादास वैद्य यांनी केले.तर पांडुरंग भवर यांनी आभार मानले. महेश शिंदे, माऊली गायकवाड, विजय सपकाळ, मोहनराव क्षीरसागर, मोनिका निकम, अजय रणदिवे यांनी मनोगत व्यक्त केले.
या बैठकीत संमत करण्यात आलेले ठराव असे: बारा बलुतेदार आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करून ५०० कोटींचा निधी उपलब्ध करून द्या, कोरोनाकाळात आत्महत्या केलेल्या समाजबांधवांना आर्थिक मदत द्या, नाभिक समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करा, प्रतापनगर येथे शूरवीर जिवबा महाले यांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात यावे, वीर भाई कोतवाल यांच्या नावाने बारा बलुतेदारांसाठी सबलीकरण योजना राबविण्यात यावी, ५० वर्षांवरील सलून कामगारांना दीड हजार रुपये मानधन सुरू करण्यात यावे.