औरंगाबाद: मराठा समाजाच्या मागण्यासाठी शांततेच्या मार्गाने ठिय्या देणाऱ्या आंदोलकाना अटक करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न शासनाने केला. आता आठ दिवसांत समाजाच्या मागण्या मान्य न झाल्यास थेट मातोश्रीवर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे मुख्य समन्वयक रमेश केरे पाटील आणि आप्पासाहेब कुढेकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.
त्यांनी सांगितले की, क्रांतीचौकात ८ ऑगस्टपासून सनदशीरमार्गाने ठिय्या देणाऱ्या आंदोलकांवर गुन्हे नोंदवून पोलिसांनी त्यांना अटक केली. मराठा समाजाच्या मागण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू असतांना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे, मंत्री एकनाथ शिंदे आणि दिवाकर रावते यांनी आंदोलकाना एस. टी. महामंडळात नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आजपर्यंत त्या आश्वासनाची अमलबजावणी झाली नाही. मराठा आरक्षण लढ्यात आत्मबलिदान देणाऱ्या ४२ बांधवांच्या वारसाला प्रत्येकी १० लाख रुपये आणि शासकीय नोकरीचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र केवळ बीड जिल्ह्यातील ७ तरुणांच्या कुटुंबाला प्रत्येकी पाच लाखाची मदत देण्यात आली. उर्वरीत कुटुंबाला तात्काळ मदत द्यावी, गत सरकारच्या काळात मराठा आरक्षण आंदोलनात पोलिसांनी दाखल केलेली १३ हजार गुन्हे मागे घ्यावे यासह अन्य मागण्यासाठी हे आंदोलन सुरू आहे.
मागण्या मान्य होईपर्यंत मागे हटणार नाही
औरंगाबादमधील क्रांतीचौकात १० ऑगस्ट रोजी आंदोलकाना अटक करून आंदोलनाला चिरडण्याचा प्रयत्न शासनाने केला. आठ दिवसांत शासनाने मागण्या मान्य न केल्यास थेट मातोश्रीबाहेर ठिय्या आंदोलन केले जाईल. पोलीस आम्हाला जेथे अडवतील तेथे ठिय्या देऊ, आमरण उपोषण करू मात्र मागण्या मान्य होईपर्यंत मागे हटणार नाही असे त्यांनी सांगितले. मराठा समाजाचे विविध गट आंदोलन करीत आहेत तुम्ही सर्वजण एकत्र येऊन आंदोलन का करत नाही असे विचारले असता केरे पाटील आणि कुढेकर म्हणाले की, आम्ही जरी वेगवेगळे आंदोलन करीत असलो तरी आमच्या मागण्या एकच आहेत.