औरंगाबाद : परभणी, सातारा आणि जळगाव जिल्ह्यातील तलाठी, मंडल अधिकाऱ्यांनी डिजिटल स्वाक्षऱ्या वापरण्याचे काम, ऑनलाईन सर्व्हर हँग होत असल्यामुळे बंद केले आहे.
ऑनलाईन डीएससीचे सर्व्हर (डिजिटल स्वाक्षरी) जमाबंदी आयुक्तांकडून ऑपरेट केले जाते. १५ दिवसांपासून सर्व्हरची साईट दोन-दोन दिवस बंद पडते आहे. यामुळे सात-बाराच्या नोंदी होण्यास अडचणी वाढू लागल्या आहेत. तीन जिल्ह्यांतील तलाठ्यांनी डीएससीचे सर्व लॉगिन तहसीलदारांकडे जमा केले आहेत. शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी औरंगाबादसह मराठवाडा विभागात निर्णय घेतलेला नाही. निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत जमाबंदी आयुक्तांकडे ऑनलाईन तक्रार देण्यात आली आहे. फेरफार होत नसल्यामुळे लोकांची ओरड वाढली आहे. साईट सुरू असली तरी ५ ते ६ सात-बारा अपडेट होतात. त्यामुळे तलाठ्यांवर नागरी दबाव वाढत चालला आहे, असे जिल्हा तलाठी महासंघाकडून सांगण्यात आले.
सर्व्हर सुरू झाले नाहीत तर राज्यभर बंद
तलाठी महासंघाचे जिल्हाध्यक्ष अनिल सूर्यवंशी यांनी सांगितले की, राज्यातील तीन जिल्ह्यांतील काम बंद करून डिजिटल स्वाक्षरीचे सर्व लॉगिन तहसीलदारांकडे जमा केले आहेत. येत्या दोन दिवसांत जर सर्व्हर अपडेट झाले नाही, तर पूर्ण राज्यात डिजिटल स्वाक्षरीचे काम बंद करण्यात येईल.