पैठण : जुन्या वादातून दोन युवकात झालेल्या हाणामारीत गंभीर जखमी झालेल्या एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी समोर आली. या प्रकरणी पोलिसांनी एका जणास अटक केली आहे. दोन महिन्यांपूर्वी दारूच्या दुकानात धक्का लागल्याने मृताने आरोपीस चापट मारल्याच्या रागातून हा खून झाल्याचे पुढे आले आहे. योगेश रावसाहेब निवारे ( ३५, रा. नवीन कावसान ) असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे.
सोमवारी पैठण शहरातील पेट्रोल पंप व कावसानकर स्टेडियमच्यामध्ये असलेल्या रस्त्यावर जखमी अवस्थेत एक तरुण आढळला आला होता. सामाजिक कार्यकर्ते शेखर शिंदे, नामदेव खराद आदींनी १०८ रूग्णवाहिके द्वारे त्यास उपचारासाठी औरंगाबाद येथील शासकीय रूग्णालयात पाठवले होते. दरम्यान, योगेश निवारे सोमवारी लग्नासाठी शहरातील आशीर्वाद मंगल कार्यालयात जातो असे सांगून घरातून गेला होता. दोन दिवस झाले तरीही तो घरी न परतल्याने शोध घेउन शेवटी तो बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविण्यासाठी फोटो घेऊन योगेशचे नातेवाईक बुधवारी रात्री ११ वाजेच्या दरम्यान पैठण पोलीस ठाण्यात आले. पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी मिसींग असलेल्या योगेश निवारेचा फोटो शेखर शिंदे यांना दाखवला. सोमवारी १०८ रूग्णवाहिकेने उपचारासाठी औरंगाबाद येथे पाठवलेला तरूणच योगेश निवारे असल्याचे शेखर शिंदे यांनी पोलीस निरीक्षक पवार यांना सांगितले. दरम्यान त्याच रात्री १२ वाजेच्या दरम्यान उपचारादरम्यान योगेशचा मृत्यू झाला.
दोन महिन्यांपूर्वी दारूच्या दुकानात झाले होते भांडणमयत योगेशच्या भावाने दिलेल्या फिर्यादी नुसार, दोन महिन्यांपूर्वी योगेश शहरातील एका देशी दारूच्या दुकानात होता. यावेळी त्याला सोनाजी शिवाजी ढवळे ( रा खळवाडी, पैठण ) याचा धक्का लागला. यामुळे योगेशने दुकानातच सोनाजीच्या कानशिलात मारल्या . तेव्हापासून सोनाजीच्या मनात योगेश विषयी राग होता. सोमवारी शहरातील आशीर्वाद मंगल कार्यालयात एका विवाहासाठी दोघे समोरासमोर आले. यातून जुना राग उफाळून आला. मंगलकार्यालया बाहेर येताच सोनाजीने योगेशच्या गाडीची चावी काढून घेतली व तो पेट्रोल पंपाच्या पाठिमागे गेला. योगेश चावी घेण्यासाठी त्याच्या पाठोपाठ गेला व तेथे दोघात तुंबळ हाणामारी झाली. यानंतर गंभीर जखमी अवस्थेतील योगेशला तिथेच सोडून सोनाजी निघून गेला. काही वेळाने जखमी अवस्थेतील योगेशला नागरिकांनी रूग्णालयात दाखल केले.
आरोपीस अटकमयत योगेशचा भाऊ गणेश रावसाहेब निवारे यांनी या बाबत पैठण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी सोनाजी शिवाजी ढवळे याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी केली.