पाटण्यातील विरोधकांची बैठक राहुल गांधींच्या लग्नासाठी होती का? दानवेंनी उडवली खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2023 04:41 PM2023-06-26T16:41:02+5:302023-06-26T16:45:45+5:30

''मोदी सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. ते पंतप्रधान झाल्याचे विरोधकांना पचनी पडत नाही.'' - रावसाहेब दानवे

Was the opposition meeting in Patna for Rahul Gandhi's marriage? Raosaheb Danve mocked | पाटण्यातील विरोधकांची बैठक राहुल गांधींच्या लग्नासाठी होती का? दानवेंनी उडवली खिल्ली

पाटण्यातील विरोधकांची बैठक राहुल गांधींच्या लग्नासाठी होती का? दानवेंनी उडवली खिल्ली

googlenewsNext

पैठण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आगामी लोकसभेत हरविण्यासाठी देशातील १५ विरोधी पक्षांची बिहारमधील पाटण्यात बैठक झाली. त्यांचा अजेंडा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हरवायचा आहे. परंतु, याच बैठकीत लालूप्रसाद यादव यांनी राहुल गांधींना लग्न करा असा सल्ला दिला, त्यामुळे ही बैठक लग्न जमवायला आयोजित केली होती की, मोदी यांना हरविण्यासाठी होती अशा शब्दांत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी विरोधी पक्षाच्या बैठकीची खिल्ली उडवली. ते भाजपातर्फे आयोजित पैठण येथील लाभार्थी संमेलनात ते बोलत होते.

पैठण येथील पितांबरी मंगल कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला ९ वर्ष पूर्ण  झाल्याच्यानिमित्ताने महाजनसंपर्क अभियान आज आयोजन करण्यात आले होते. यात अंतर्गत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली लाभार्थी संमेलनाचे आज आयोजन करण्यात आले होते. पुढे बोलताना दानवे म्हणाले की, सर्व विरोधक भाजपाला जातीवादी म्हणतात. पण, शरद पवार यांनी आमच्यासोबत निवडणूक लढविली होती. भाजपाच्या केंद्रातील सरकारमध्ये नितीश कुमार, ममता बॅनर्जी हे रेल्वे मंत्री होते. मायावती भाजपाच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाल्या होत्या. फारूक अब्दुल्ला हे आमच्या सरकारसोबत होते. तेव्हा आम्ही जातीवादी नव्हतो का, या सर्वांची तोंडे खरकटी आहेत. यांना वाढायला मीच होतो,  अशी पुष्टी जोडत भाजपाच्या कार्यकर्त्यांनी हे जनतेला सांगावे असे आवाहन त्यांनी केले. मोदी सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. ते पंतप्रधान झाल्याचे विरोधकांना पचनी पडत नाही. देश मजबूत माणसाच्या हातात आहे. त्यामुळे देशाची परिस्थिती चांगली आहे. देशातील सरकार गरीबांसाठी काम करत आहे. यावेळी आवास, गँस, मोफत धान्य, मोफत विमा, शेतकरी अनुदान , आरोग्य योजना मोदी सरकारने सुरू केल्या असून या बाबत कार्यकर्त्यांनी जनतेला माहिती द्यावी अशा सूचना देखील दानवे यांनी केल्या.

यावेळी माजी नगराध्यक्ष सुरज लोळगे यांनी पुरातत्व खात्याच्या हरकतीने बंद पडलेल्या पैठण शहरातील पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू करण्यासाठी दिल्ली येथील पुरातत्व खात्याची परवानगी केंद्रीय मंत्री दानवे यांनी मिळवून द्यावी अशी मागणी केली. जिल्हाध्यक्ष विजय औताडे, तालुकाध्यक्ष डॉ. सुनील शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी महिला प्रदेश उपाध्यक्ष रेखाताई कुलकर्णी, माजी उपनगराध्यक्ष सुचित्रा जोशी, कांतराव औटे, अश्विनी लखमले, नम्रता पटेल, लक्ष्मण औटे, महेश जोशी, शेखर पाटील, भाऊसाहेब बोरूडे, समीर शुक्ल, विजय चाटुपळे, बप्पा शेळके, कल्याण गायकवाड, योगेश सोलाटे, सुरेश गायकवाड, सिध्दार्थ परदेशी, सुनील वीर, सुलोचना साळुंके, महादेव बटुळे, निखिल गुप्ता, गीता पटेल, विजय ठाणगे, बंडू आंधळे, कैलास बरकसे, प्रशांत आव्हाड, आदीसह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. 

Web Title: Was the opposition meeting in Patna for Rahul Gandhi's marriage? Raosaheb Danve mocked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.