वाळूज महानगर : वाळूज ग्रामपंचायत साफसफाईकडे दुर्लक्ष करीत असल्याने नवीन वसाहतींत कच-याचे ढीग साचले आहेत. कच-यामुळे दुर्गंधी व डासांचा फैलाव वाढला असून, साथीचे आजार पसरत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
येथील साठेनगरासह नवीन वसाहत भागात कचरा संकलनासाठी घंटागाडी फिरकत नाही. त्यामुळे नागरिक घरात साचलेला ओला व सुका कचरा रस्त्यावर मोकळ्या ठिकाणी आणून टाकत आहेत. हा कचरा सडून परिसरात दुर्गंधी व डासांचा फैलाव वाढला आहे. तसेच मोकाट जनावरे व कुत्र्याचा वावरही वाढला आहे.
या विषयी वारंवार तक्रारी करुनही ग्रामपंचायत याकडे डोळेझाक करीत असल्याचा आरोप रहिवाशांकडून केला जात आहे. ग्रामपंचायतीने रस्त्यावर साचलेला कचरा तात्काळ उचलून परिसर स्वच्छ करावा अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे.