लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : तीन वर्षांपासून दुष्काळाचा सामना केल्यानंतर २०१६ मध्ये वरुणराजाने मराठवाड्याला थोडा दिलासा दिला; परंतु यंदा पुन्हा कमी पाऊस झाल्यामुळे मराठवाडा मेटाकुटीला आला आहे. शेतकºयांनी जून महिन्यात केलेली खरिपाची पेरणी पावसाने दडी मारल्यामुळे संपुष्टात आली आहे. विभागातील आठ जिल्ह्यांंत खरीप पेरणीत अंदाजे २ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झालेली असून, ती जवळजवळ वाया गेल्यात जमा झाली आहे.२०१५ साली केंद्रीय दुष्काळ निवारण आयुक्तालयाकडून विभागातील टंचाईचा आढावा घेतला होता. यंदा मात्र केंद्र आणि राज्याचे कुठलेही पथक मराठवाड्याच्या पाहणीसाठी येण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. कृत्रिम पावसाची यंत्रणाही नुकतीच हलविण्यात आली.खरीप हंगाम पावसाअभावी हातून जाणार असल्यामुळे शेतकरी पुरता हताश झाला आहे. पाऊसच नसल्यामुळे दुबार पेरणीदेखील आता होणे शक्य नाही. खरीप व रबी मिळून ६२ लाख हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी ५४ लाख हेक्टरवर सरासरी पेरणी होते. मराठवाड्यात एकूण ४९ लाख हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी अंदाजे ४४ लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. नांगरणी, पेरणी, खतांसाठी एकरी केलेल्या १० ते १२ हजार रुपयांच्या खर्चासह मजुरी आणि इतर खर्चाचा आकडा विचारात घेतला, तर विभागात खरीप पेरणीवर २ हजार कोटींहून अधिक झालेली गुंतवणूक मातीत गेली आहे. यापुढे पाऊस झाला तरी, त्यातून खरीप पीके तगण्याची चिन्हे नाहीत. परंतु पिण्यासाठी पाणी आणि फळ बागायत त्यातून जगू शकते. त्यामुळे सर्वाचे डोळे वर लागले आहेत.
खरीप पेरणीचे २ हजार कोटी वाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 12:30 AM