परभणी : परतीच्या पावसाने जिल्ह्यात कहर केला असून दररोज पाऊस होत असल्याने खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. शनिवारी जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस झाला. शुक्रवारी रात्री गंगाखेड तालुक्यात झालेल्या पावसाने मासोळी नदीला पूर आला होता. या पुराचे पाणी पिंपळदरीसह दोन गावांत घुसल्याने ग्रामस्थांना पुरापासून बचाव करण्यासाठी छतावर जावून थांबावे लागले.यावर्षी परभणी जिल्ह्यात धुवांधार पाऊस होत आहे. परतीच्या पावसाने जिल्ह्यामध्ये थैमान घातले आहे. दोन आठवड्यापासून हा पाऊस होत आहे. शुक्रवारी हवामान खात्याने मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा दिला होता. त्यानुसार जिल्ह्यात सकाळपासूनच पावसाला प्रारंभ झाला. परभणी शहर व परिसरात दिवसभर ढगाळ वातावरण होते. दुपारी ३ वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस सुरु झाला. दोन ते अडीच तास पावसाचा जोर कायम होता. या पावसामुळे शहरात पाणीच पाणी झाले. परभणी तालुक्यासह पूर्णा, पाथरी, मानवत या तालुक्यांमध्येही जोरदार पाऊस झाला. मानवत शहरामध्ये दीड तास विजांच्या कडकडाटांसह पाऊस झाला. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. पाथरी तालुक्यातही शनिवारी मोठा पाऊस झाला. मानवत शहरातील ग्रामीण रुग्णालय परिसरातील वसाहतीत असलेले एक झाड कोसळले. परंतु, कोणतीही हानी झाली नाही. पालम तालुक्यात शुक्रवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे शनिवारी पहाटेपासूनच जांभूळबेट रस्त्यावरील वाहतूक ठप्प पडली होती. ९ गावांचा संपर्क तुटला होता. तालुक्यात १५ दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. जांभूळबेट रस्त्यावरील लेंडी नदीला वारंवार पूर येत असल्याने आतापर्यंत १५ वेळा हा रस्ता बंद पडल्याने ग्रामस्थांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. (प्रतिनिधी)पेडगावमध्ये बैलजोडी गेली वाहूनपेडगाव आणि परिसरात शनिवारी तीन तास मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे गावाजवळून वाहणाऱ्या ओढ्याला पूर आला आहे. शनिवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास अहमद खॉ आयुब खॉ पठाण हे बैलगाडी घेऊन शेतातून घरी परत येताना ओढ्यातून बैलगाडी काढत असताना बैलजोडीसह गाडी वाहून गेली. पठाण यांनी गाडीतून उडी घेऊन आपला जीव वाचविला. ही बैलजोडी शेख इब्राहीम शेख रहीम यांच्या मालकीची असल्याची माहिती मिळाली.मासोळी नदी : पुराचे पाणी घुसल्याने ग्रामस्थांची धांदलगंगाखेड तालुक्यातील मासोळी नदीला शनिवारी पूर आल्याने पिंपळदरीसह कड्याची वाडी आणि कातकरवाडी या गावांना पाण्याचा वेढा पडला होता. पुराच्या पाण्यापासून बचाव करण्यासाठी अनेक ग्रामस्थांनी घराच्या छतांचा आधार घेतला.४तालुक्यात सर्वदूर पाऊस होत असल्याने नदी, नाले, तलाव तुडुंब भरले आहेत. शुक्रवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पिंपळदरी गावाजवळून वाहणाऱ्या मासोळी नदीला रात्री १२ वाजेच्या सुमारास पूर आला. पुराच्या पाण्याने डॉ. आंबेडकरनगर भागातील समाज मंदिरासह ज्ञानोबा विश्वनाथ पैठणे, सायस शंकर पैठणे, ज्ञानोबा भीमराव पैठणे यांच्या घराला वेढा घातला.४ याच परिसरात असलेल्या पिराच्या दर्गामध्ये हे पाणी शिरले. त्यात दर्गाची भिंत खचली असून शेख मैनोद्दीन शेख करीम यांच्या घरातील संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. ४नदीपात्राजवळ असलेल्या डॉ. आंबेडकरनगर व पिराचा दर्गा परिसरातील घरात पाणी शिरल्याची माहिती समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी भेट घेतली. सकाळी ११ वाजेच्या सुमारास अथक प्रयत्न करुन घरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात आले. या पुरामुळे प्रभाकर मुंडे यांच्या घराची भिंत कोसळली आहे. परभणी- मानवत रस्ता बंदमानवत तालुक्यातील आंबेगावचा तलाव १०० टक्के भरला आहे. शनिवारच्या पावसाने तलावात अचानक पाण्याची आवक वाढली. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास तलावाच्या सांडव्यावरुन तीन फूट उंचीने पाणी वाहत होते. हे पाणी कोल्हावाडी गावातील घरापर्यंत पोहोचले. रात्री ९.३० वाजेच्या सुमारास परभणी- मानवत रस्त्यावरील ओढ्याला पूर आल्याने मुख्य रस्त्यावरुन दोन फुटापर्यंत पाणी वाहत असल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, मानवत शहर व परिसरातही जोरदार पाऊस झाला असून शहरातील आंबेडकरनगर भागात राहणाऱ्या सुदाम पंडित यांच्या घरात नाल्याचे पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले.निम्न दुधनाचे चार दरवाजे उघडलेसेलू तालुक्यात सायंकाळी उशिरा विजांच्या कडकडाटासह पावसाला प्रारंभ झाला. तालुक्यात असलेल्या निम्न दुधना प्रकल्पामध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. जालना जिल्ह्यातील भाग निम्न दुधना प्रकल्पाच्या पाणलोेट क्षेत्रात येत असल्याने या दोन्ही जिल्ह्यात झालेल्या पावसाचे पाणी दुधना धरणात दाखल होत आहे. या धरणाचे दोन दरवाजे २३ सप्टेंबरपासून उघडलेले असून ३०० क्युसेसने पाण्याचा विसर्ग होत होता. शनिवारी रात्री ८ वाजता आणखी दोन दरवाजे उघडण्यात आले असून दोन हजार क्युसेसने नदीपात्रात पाणी सोडले जात आहे.ढालेगाव बंधाऱ्यातून विसर्ग४पाथरी तालुक्यात शनिवारी एक ते दीड तास मुसळधार पाऊस झाला. दिवसभर पावसाची रिपरिप सुरु होती. पाथरी शहरानजीक असलेल्या ढालेगाव बंधाऱ्यामध्ये पाण्याची आवक वाढत असल्याने या बंधाऱ्याचे दोन गेट उघडून पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात केला जात आहे. पिकांचे मोठे नुकसान४जिल्ह्यात पावसाने खरीप पिकांचे नुकसान होत आहे. शेत जमिनीमध्ये साचलेल्या पाण्याचा निचरा होत नसल्याने पिकांना फटका बसत आहे.
परतीच्या पावसाचा कहर
By admin | Published: October 02, 2016 1:05 AM