छत्रपती संभाजीनगर : बनावट औषधांची निर्मिती करणाऱ्या रॅकेटने टाल्कम पावडर आणि स्टार्चचा वापर केलेल्या औषधींचा महाराष्ट्रासह देशभरातील सरकारी रुग्णालयांना पुरवठा केल्याचे पोलिसांच्या तपासणीतून उघडकीस आले. गोरगरीब रुग्णांसाठी घाटी रुग्णालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालय आधार देणारे ठरत आहे. गेल्या वर्षभरात या ठिकाणी पुरवठा आलेल्या १३ औषधींची औषध प्रशासनाकडून तपासणी करण्यात आली. सुदैवाने ११ नमुने प्रमाणित घोषित झाले असून, दोन औषधी नमुन्यांचे अहवालांची प्रतीक्षा आहे.
महाराष्ट्रात डिसेंबर २०२३ मध्ये उघडकीस आलेल्या बनावट औषधांची निर्मिती आणि त्यांचा पुरवठा करणाऱ्या रॅकेटचा संपूर्ण छडा लावण्यात पोलिसांना यश आले. महाराष्ट्रासह देशभरात सरकारी रुग्णालयांना पुरविलेल्या औषधांमध्ये चक्क टाल्कम पावडर आणि स्टार्चचा वापर करण्यात आल्याचे समोर आले. घाटी आणि जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. या ठिकाणी रुग्णांना औषधी मोफत दिली जातात. या औषधींची वेळोवेळी तपासणी करून खबरदारी घेतली जात असल्याचे सांगण्यात आले.
जिल्हा रुग्णालयात ओपीडीत रोजचे रुग्ण : ८०० ते १,०००घाटी रुग्णालयात ओपीडीत राेजचे रुग्ण : १,५०० ते २,०००
लस दिल्यानंतर काहींना ‘रिॲक्शन’मोकाट कुत्रा चावल्यानंतर घाटीत उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांना रेबीज लस दिली. तेव्हा काहींना ‘रिॲक्शन’ झाल्याचे एप्रिलमध्ये समोर आले होते. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने तत्काळ खबरदारी घेत संबंधित लसीचा वापर थांबविला आणि नवीन लसीचा वापर करण्याच्या सूचना केल्या.
गुणवत्ता तपासणीरुग्णालयाला प्राप्त औषधींची गुणवत्ता तपासणीसाठी पाठविली जातात. औषधी कंपन्याही पाठवित असतात. आतापर्यंत तपासणीतून खराब आणि बनावट औषधी मिळालेले समोर आलेले नाही.- डाॅ.दयानंद मोतीपवळे, जिल्हा शल्यचिकित्सक.
औषधी प्रशासनाकडून तपासणीघाटीतील औषधींची रँडम तपासणी केली जाते, तसेच कधी संशय वाटला, नवीन ब्रँडची औषधे आल्यास औषध प्रशासनाकडून तपासणी केली जाते. यापूर्वी रेबीज लसीच्या एका बॅचमुळे रिॲक्शन येण्याचा प्रकार झाला होता. तेव्हा तत्काळ वापर थांबविला होता.- डाॅ.शिवाजी सुक्रे, अधिष्ठाता, घाटी.
नियमित तपासणीमार्चपासून आतापर्यंत घाटी रुग्णालयातील ८ आणि शासकीय कर्करोग रुग्णालयातील एक औषधीचे नमुने विश्लेषणासाठी पाठविण्यात आले, तर गतवर्षी सप्टेंबरमध्ये जिल्हा रुग्णालयातील ४ औषधींची नमुने तपासणीसाठी काढण्यात आले. त्यापैकी ११ नमुने प्रमाणित घोषित झाले असून, केवळ दोन औषधी नमुन्यांचे अहवाल बाकी आहेत. रुग्णालयाकडून औषधीबाबत काही तक्रार आल्यास, तसेच नियमित तपासणीच्या वेळी आम्ही स्वत:हून औषधी नमुने तपासणीसाठी काढत असतो.- राजगोपाल बजाज, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन (औषध)