छत्रपती संभाजीनगर : बदलती जीवनशैली, अपुरी झोप, तणाव, असंतुलित आहार यामुळे अपस्मार अर्थात एपिलेप्सी आजाराचा धोका वाढतो. उशिरापर्यंत स्क्रीनवर वेब सिरीज पाहणे, रील्स पाहणे यामुळे एपिलेप्सीचे रुग्ण वाढत असल्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे वेळीच सावध झालेले बरे.
एपिलेप्सी हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे, ज्यात मेंदूवर दीर्घकालीन परिणाम होतात. ज्यामुळे रुग्णाला कोणतीही पूर्वकल्पना न मिळता अचानक झटका येतो. बऱ्याचदा रुग्णाची शुद्ध हरपते. फिट येणे हे या आजाराचे प्राथमिक लक्षण आहे. यात अनेकदा रुग्णाची स्मरणशक्ती कमी होऊ शकते. कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला हा आजार होऊ शकतो.
काय आहे एपिलेप्सी किंवा अपस्मार आजार?मेंदूची क्रिया म्हणजे एक प्रकारची विद्युत लहर असते. ही विद्युत लहर अनियंत्रित झाल्यास रुग्णाच्या हात, पायांची विचित्र हालचाल होऊन बेशुद्ध होतो. याला झटका आला असे म्हणतो. वारंवार असे झटके येणे म्हणजे एपिलेप्सी किंवा अपस्मार होय.
कोणत्या सवयी पडू शकतात महाग?उशिरापर्यंत वेब सिरीज पाहणे : रात्री उशिरापर्यंत चित्रपट, वेब सिरीज पाहण्यावर अनेकांचा भर असतो. यातूनच जागरण होते.
मोबाइल स्क्रीनवर उशिरापर्यंत राहणे : सामाजिक माध्यमांवर सक्रिय राहण्यासाठी उशिरापर्यंत मोबाइलचा वापर केला जातो.अपुरी झोप घेणे : उशिरापर्यंत जागरण केल्यानंतरही लवकर उठावे लागते. त्यातून अपुरी झोप होते. यातूनच एपिलेप्सीचा धोका वाढतो.
काय काळजी घ्याल?झोपेच्या वेळा पाळा : झोपेच्या वेळा पाळल्या पाहिजेत. रात्री लवकर झोपणे आणि सकाळी लवकर उठणे, हे आरोग्यदायी ठरते.स्क्रीन टाइम कमी करा : मोबाइलचा वापर कमी करण्यावर भर द्यावा. त्यातून स्क्रीन टाइम कमी होण्यास मदत होईल. रात्री वेब सिरीज नकोच : रात्री उशिरापर्यंत वेब सिरीज पाहणे, सोशल मीडियावर सक्रिय राहणे टाळावे.
झोपेपूर्वी मोबाइल नकोचआजच्या काळात मोबाइल, संगणक यांचा वापर करावाच लागतो. परंतु झोपेच्या दोन तास आधी आणि सकाळी उठल्यावर एक तास मोबाइल वापरू नये. पलंगावर मोबाइल घेऊन झोपू नये. हे काही अशक्य नाही.- डाॅ. मकरंद कांजाळकर, न्यूरो फिजिशियन