छत्रपती संभाजीनगर : जुन्या शहरात पाणीप्रश्न गंभीर वळण घेत आहे. बहुसंख्य वसाहतींना तब्बल १२ दिवसानंतर पाणी मिळत आहे. महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडे नागरिकांनी विचारणा केली तर तांत्रिक अडचण आहे एवढेच उत्तर मिळते. पाणी पुरवठा विभागाच्या भोंगळ कारभारामुळे सर्वसामान्य मेटाकुटीला आले आहेत. महापालिकेने मागील वर्षी खंडपीठात संपूर्ण शहराला चार दिवसाआड म्हणजेच पाचव्या दिवशी पाणी देण्याचे शपथपत्र दिले. वर्षभरात एक महिनाही याची अंमलबजावणी झाली नाही, हे विशेष.
हर्सूल तलावातून १४ वॉर्डांना पाणी पुरवठा होतो. दिल्लीगेट, शहागंज पाण्याच्या टाक्यांवरून होणारा पाणी पुरवठा तब्बल १२ दिवसांवर गेला आहे. सिडको एन-५ येथील जलकुंभावरून ज्या वसाहतींना पाणी देण्यात येते, त्यांचीही अवस्था आठ ते नऊ दिवसानंतर अशी आहे. महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडे कोणतेही नियोजन नसल्यामुळे नाहक नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. जायकवाडी धरणातून दररोज १२० ते १२५ एमएलडी पाणी शहरात येत आहे. हर्सूल तलावातून जवळपास ६ ते ७ एमएलडी पाण्याचा उपसा करण्यात येतोय. त्यानंतरही पाण्यासाठी नागरिकांची ओरड वाढतच आहे.
बायजीपुऱ्याला आज बाराव्या दिवशी पाणीबायजीपुरा भागाला आज १२ दिवस झाले तरी पाणी मिळालेले नाही. नागरिकांनी पाणी पुरवठा विभागाकडे विचारणा केली तर बारी कॉलनीचा टप्पा संपल्यावर रात्री उशिरा बायजीपुऱ्याला पाणी देण्यात येईल. एन-५ पाण्याच्या टाकीवर तांत्रिक अडचणी असल्याचे सांगण्यात आले.
पाणी नेमकं मुरतंय कुठे?सिडको एन-५ येथील जलकुंभावरून टँकर भरू नयेत, असा नियम केला होता. अलीकडे काही टँकर पुन्हा येथून पाणी भरू लागले आहेत. किती टँकर रोज भरले जातात, कुठे जातात, याचा कोणताही हिशेब पाणी पुरवठा विभागाकडे नाही.
न्यायमूर्तींकडे केली तक्रारमहानगरपालिकेकडून १२ दिवसांतून एकदा पाणी पुरवठा केला जात आहे. रोशनगेट, बशीर कॉलनी, नागसेन कॉलनी परिसरातील नागरिकांनी खंडपीठाच्या न्यायमूर्तींकडे लेखी तक्रार केली आहे. तक्रारीत न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आल्याचे माजी नगरसेवक माेहसीन अहेमद यांनी सांगितले.