पैठण : नाशिक पाठोपाठ आता अहमदनगर धरण समूहातील पाणीजायकवाडी धरणाकडे झेपावले आहे. ओझर वेअर मधून मंगळवारी दुपारी प्रवरा नदीत ६३०१ क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात आला असून गतीने पाणी जायकवाडीकडे मार्गस्थ झाले आहे. बुधवारी दुपारनंतर हे पाणी नाथसागरात दाखल होणार आहे. मंगळवारी नाथसागरात १५५१६ क्युसेक्सने आवक सुरू होती, सायंकाळी धरणाचा जलसाठा ६७.७०% एवढा होता.
नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातील एकत्रित विसर्ग दि. १४ ऑगस्टपासून नांदूरमधमेश्वर वेअरमधून गोदावरी पात्रात करण्यात येत आहे. या पाण्यामुळे जायकवाडीच्या जलसाठ्यात जवळपास १२ % भर पडली आहे. मंगळवारी अहमदनगर जिल्ह्यातील ओझर वेअर मधून प्रवरा नदीत ६३०१ क्युसेक्स क्षमतेने विसर्गास दुपारी प्रारंभ करण्यात आला. हे पाणी जायकवाडी धरणाकडे झेपावले असून बुधवारी दुपारनंतर हे पाणी जायकवाडी धरणात पोहचेल असे जायकवाडीचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले.
नाशिक जिल्ह्यातील नांदूरमधमेश्वर वेअर मधून गोदावरी पात्रात होणारा विसर्ग आज ६४५६ क्युसेक्स पर्यंत घटविण्यात आला असून गोदावरी नदीतून येणारी आवक घटली आहे. दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील पाणी जायकवाडी धरणात दाखल होणार असल्याने जायकवाडी धरणात आवक सुरू राहील असे धरण अभियंता बुद्धभूषण दाभाडे, संदिप राठोड यांनी सांगितले. मंगळवारी सायंकाळी सहा वाजेस धरणाची पाणीपातळी १५१५.५८ फूट झाली होती. धरणात १५५१६ क्युसेक्स क्षमतेने आवक सुरू होती. धरणात एकूण जलसाठा २२०७.८५८ दलघमी तर उपयुक्त जलसाठा १४६९.७५२ दलघमी इतका झाला आहे.
धरणाचा फोटो काढल्यास गुन्हा दाखल होणारजायकवाडी धरणाचा जलसाठा वाढत असल्याने जायकवाडी प्रशासन सज्ज झाले आहे. धरणाच्या बाबतीत जुने व्हिडीओ टाकून पाणी सोडण्यात आले अशा अफवा पसरविल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय आज झालेल्या वरिष्ठ स्तरावरील बैठकीत घेण्यात आला आहे. दरम्यान, धरणाचे फोटो व चित्रिकरण विनापरवानगी काढल्यास धरण सुरक्षा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा धरण अभियंता बुद्धभूषण दाभाडे यांनी दिला आहे.