छत्रपती संभाजीनगर: जायकवाडी धरण शंभर टक्के भरले आहे. दरम्यान, धरणाच्या मध्यभागी नवीन पाणीपुरवठा योजनेचे जॅकवेल उभारण्यात येत आहे. जॅकवेलमध्ये पाणी येऊ नये म्हणून मागील वर्षीच चारही बाजूने जीव्हीपीआर कंपनीकडून कॉफरडॅम (सिमेंटचे आवरण) तयार करून घेतले. त्यानंतरही जॅकवेलमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे.
मागील पंधरा दिवसांपासून जॅकवेलच्या काँक्रिटीकरणाचे काम बंद होते. जॅकवेलमध्ये आलेले पाणी उपसण्यासाठी ७५ एचपीच्या तब्बल १० मोटारी २४ तास सुरू आहेत. दररोज दोन हजार लिटर डिझेल पाणी काढण्यासाठी लागत आहे. जॅकवेल १०० मीटर लांब, ३४ मीटर रुंद आहे. खोली १९ मीटर आहे. महाराष्ट्रात एवढ्या खोलीपर्यंत एकही जॅकवेल आजपर्यंत बांधण्यात आला नसल्याचा दावा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा आहे.
जॅकवेलचे वैशिष्ट्य म्हणजे १९२ कॉलम आहेत. प्रत्येक चार मीटरवर एक दीड मीटर आकाराचा कॉलम असून, त्यामध्ये ३२ एमएमच्या लाेखंडाचा वापर होतोय. पुढील १०० वर्षे तरी धरणातील या जॅकवेलला धोका राहणार नाही. सध्या क्रेनच्या साह्याने गुरुवारपासून काँक्रिटीकरण सुरू आहे.