छत्रपती संभाजीनगर : जसजसे नवीन जलकुंभ मिळतील, तसतसे त्या भागातील पाणीपुरवठ्याच्या दिवसांमधील अवधी (गॅप) कमी करा, असे निर्देश खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. वाय.जी. खोब्रागडे यांनी मंगळवारी येथील महापालिकेला दिले.
पाण्याच्या टाक्या मिळाल्यानंतर जलसाठा वाढेल. मात्र, मुख्य जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतरच पाणीपुरवठ्याच्या दिवसातील अवधी कमी करता येईल, अशी तांत्रिक अडचण मनपातर्फे निदर्शनास आणून देण्यात आली असता, नवीन टाकी बांधलेल्या परिसराचा पाणीपुरवठ्याच्या दिवसांमधील अवधी कमी करण्यास सुरुवात करा, असे खंडपीठाने निर्देश दिले. या जनहित याचिकेवर ७ सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी आहे.
खंडपीठाच्या २८ जुलैच्या आदेशानुसार हनुमान टेकडीवरील २१.३ लाख लि. पाणी साठवण क्षमता असलेला नवीन जलकुंभ आणि टी. व्ही. सेंटर येथील २१ लाख लि. क्षमता असलेला नवीन जलकुंभ ३१ ऑगस्टला, हिमायतबाग येथील ३८ लाख लि. क्षमता असलेला नवीन जलकुंभ ३० सप्टेंबरला आणि दिल्लीगेट येथील ३० लाख लि. चा नवीन जलकुंभ ३१ ऑक्टोबरला महापालिकेला सोपविला जाईल, असे आश्वासन कंत्राटदारातर्फे देण्यात आले होते. मात्र, अद्याप एकही जलकुंभ मनपाला सोपविला नसल्याचे ॲड. संभाजी टोपे यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. काही अडचणीमुळे उशीर झाला असला तरी निर्धारित वेळेत जलकुंभ सोपविण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन पुन्हा एकदा कंत्राटदारातर्फे देण्यात आले.
ज्येष्ठ विधिज्ञ आर.एन. धोर्डे यांनी कंत्राटदारातर्फे झालेल्या कामाची छायाचित्रे आणि माहिती सादर केली. ज्येष्ठ विधिज्ञ राजेंद्र देशमुख यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे या प्रकल्पाच्या कामाची १९ जुलै रोजी करण्यात आलेल्या स्थळतपासणीचा (स्पॉट इन्स्पेक्शन) अहवाल सादर केला. त्याचप्रमाणे मुख्य सरकारी वकील डी.आर. काळे यांनी प्रकल्पावर देखरेख ठेवण्यासाठी खंडपीठाने नियुक्त केलेल्या समितीच्या बैठकीचा अहवाल सादर केला. वीज कंपनीतर्फे ॲड. अनिल बजाज, न्यायालयाचे मित्र ॲड. सचिन देशमुख, एमजेपीतर्फे ॲड. विनोद पाटील आणि मूळ याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. अमित मुखेडकर काम पाहत आहेत.