लोकमत न्यूज नेटवर्कफुलंब्री : तालुक्यातील पाथ्री येथील उद्यानात सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने झाडे जगविण्यासाठी रिकाम्या पाणी बाटलीच्या मदतीने थेट झाडाच्या मुळापर्यंत पाणी पोहोचविले आहे. यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होत असून, बाष्पीभवनही रोखण्यास मदत होत आहे.फुलंब्री तालुक्यातील पाथ्री परिसरात स्व. उत्तमराव पाटील जैवविविधता उद्यान सुमारे १३ हेक्टर क्षेत्रात पसरले आहे. या उद्यानात ६ हजार विविध प्रकारची झाडे आहेत. त्यात जांभूळवन, वनौषधी, बांबूवन आदींचा समावेश आहे. ही झाडे जगविण्याची जबाबदारी येथील सामाजिक वनीकरण विभागाची आहे.सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने पुरेसे पाणी मिळत नसल्याने सर्व झाडे जगविणे कठीण झाले होते. मात्र, आता झाडांना बाटलीद्वारे पाणी देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.सामाजिक वनीकरण विभागाचे वनक्षेत्रपाल डब्ल्यू. ए. काझी यांच्या मार्गदर्शनाखाली राजश्री शाहू महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या मदतीने उद्यानामधील सर्व महत्त्वाच्या झाडाला पाणी देण्याची नवीन पद्धत सुरूकेली.झाडांपर्यंत ठिबक पाईपद्वारे पाणी आणले. त्या पाईपलाईनचे पाणी सरळ झाडाला न टाकता ते रिकामी पाण्याची बाटली उलटी करून झाडाच्या मुळापर्यंत लावण्यात आली. या बाटलीमध्ये खडी भरली तसेच त्यात ठिबक पाईपचे पाणी टाकले. यामुळे ठिबकचे पाणी थेट झाडाच्या मुळाशी जाणार असून त्याचे बाष्पीभवन होणार नाही. परिणामी पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होत आहे.या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी वनपाल जे. टी. आहेर, वनपाल पी. एम. बेर्डे, वनपाल के. एम. फुले, वनपाल आर. एस. देहेडे, राजश्री शाहू विद्यालयाचे प्राचार्य एस. बी. जाधव, प्रा. ज्ञानेश्वर पाथ्रीकर, डॉ. शिवाजी उंबरहंडे, डॉ. मोटे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
बाटलीद्वारे झाडांना पाणी; वनीकरण विभागाचा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 12:07 AM