औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख जवळ येऊ लागताच शहरातील पाणी प्रश्नाने पेट घेतला आहे.
सर्व लोकप्रतिनिधी प्रचारात मग्न आहेत. पाणीपुरवठ्याकडे लक्ष देण्यासाठी कोणालाही वेळ नाही. त्यामुळे नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. बुधवारी रामनगर येथे जलवाहिनी फुटल्याने या भागातील ३० हजारांहून अधिक नागरिकांना पाणी मिळाले नाही. सिडको एन-६ भागातील जे सेक्टरमधील पाणीटंचाईला कंटाळलेल्या महिलांनी एकत्र येऊन मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला. जटवाडा रोडवर राहणाऱ्या अनेक वसाहतींना टँकरने पाणी देण्यात येते.
एमआयडीसीकडून घेण्यात येत असलेले पाणी दूषित असून, मनपाने एन-७ येथील टाकीवरूनच पाणी द्यावे, या मागणीसाठी महिलांनी आंदोलन केले.