विजय मुंडे उस्मानाबादउस्मानाबादसह जिल्ह्यातील एमआयडीसीत मोजक्याच प्रमाणात उद्योग सुरू आहेत़ असे असले तरी या उद्योगांना सध्या मुबलक प्रमाणात पाण्याचा पुरवठा होत नाही़ शिवाय अनेक ठिकाणी रात्रीच्यावेळी रस्त्यावरील पथदिवे बंद पडत आहेत़ तर इतर समस्याही समोर येत असल्याने उद्योजक हैराण झाले असून, नवीन उद्योजकही असुविधांमुळे उद्योग सुरू करण्यास धजावत नसल्याचे चित्र आहे़उस्मानाबाद, भूम, कळंब व उमरगा येथील एमआयडीसीत मोजकेच उद्योग सुरू आहेत़ या उद्योगामुळे परिसरातील मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे़ उस्मानाबादेतील एमआयडीसी ही रेल्वे स्थानक व विमान तळापासून जवळच आहे़ शिवाय शहराच्या नजीक हे क्षेत्र असल्याने बाजारपेठेत माल नेण्यासाठी उद्योजकांची गैरसोय होत नाही़ असे असले तरी या परिसरात असलेल्या महामंडळाच्या कुपनलिका सध्या उचक्या मारत आहेत़ कुपनलिकांचे पाणी अपुरे पडत असल्याने अनेक व्यवसायिकांना विकतचे पाणी आणून उद्योग चालवावे लागत आहेत़ तर पालिकेकडून पाणी घेतले जात असले तरी ते मुबलक प्रमाणात मिळत नाही़ पाण्याशिवाय रात्रीच्यावेळी बंद पडणारे पथदिवे हा ही येथील एक गंभीर प्रश्न बनला आहे़ येथील एमआयडीसीतील अंतर्गत भागातील काही रस्त्यांचीही दुरवस्था झाली आहे़ या रस्त्यांची दुरूस्ती करावी, अशी मागणी उद्योजकांमधून केली जात आहे़ कळंब येथील एमआयडीसीसाठी पालिकेकडूनच पाणी घेतले जाते़ असे असले तरी उन्हाळयातील टंचाईमुळे येथील उद्योजकांना मुबलक प्रमाणात पाणी मिळत नाही़ भूम येथील एमआयडीसी भागातील रस्ते वीज, टेलिफोन आदी प्रश्न मागील काही वर्षात सुटले आहेत़ असे असले तरी येथेही पाणी हाच प्रमुख प्रश्न असल्याचे दिसून येते़ कळंब येथील परिस्थितीही अशीच आहे़ तर उमरगा येथील उद्योगांसाठी पाणी हे पालिकेकडून घेण्याचे नियोजन आहे़ मात्र, मुबलक पाणी मिळत नसल्याने उद्योजकांना विकतच पाणी घ्यावे लागते.
पाणीप्रश्नामुळे व्यावसायिक हैराण !
By admin | Published: May 02, 2017 11:35 PM