वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरातील देवगिरी नगरात पाणी व ड्रेनेजच्या प्रश्नाने गंभीर रुप धारण केले आहे. वारंवार अर्ज, विनंत्या करुनही प्रशासन नागरी सुविधा पुरवित नसल्याने रहिवाशांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. संबंधित विभागाच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे.
सिडको प्रशासनाने दोन दशकांपूर्वी मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांसाठी स्वतंत्र योजना राबवून घराचे वाटप केले. देवगिरीनगरात लोकसंख्या कमी असल्याने सुरुवातीच्या काळात नागरी समस्या निर्माण झाल्या नाहीत. मात्र, लोकसंख्या वाढल्यानंतर सुविधा अपुऱ्या पडू लागल्या. काही दिवसांपूर्वी प्रशासनाने मुख्य रस्ते डांबरीकरण केले. त्यामुळे रस्त्याचा प्र्रश्न मार्गी लागला आहे. पण पाणी, ड्रेनेज आणि लाईटची समस्या अजूनही कायम आहे. पाणीप्रश्न तर गंभीर झाला आहे. या भागाला आठवड्यातून दोनवेळा तेही कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. त्यातही पाणीपुरवठ्याची वेळ निश्चित नसल्याने नागरिकांची तारांबळ उडते. या भागातील हातपंपही बंद आहेत. पुरेसे पाणी मिळत नसल्याने रहिवाशांचे पाण्यासाठी हाल होत असून विकतच्या पाण्याचा आधार घ्यावा लागत आहे. ड्रेनेजलाईन जीर्ण झाली असून पाईपही कमी व्यासाचे आहेत. ड्रेनेज व सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने ड्रेनेजचे चेंबर सारखे तुंबते. घाण पाणी घरासमोरच साचत असल्याने नागरिकांना दुर्गंधी त्रास सहन करावा लागत आहे. येथून वाहनाºया नैसर्गिक नाल्याचीही वेळेवर साफसफाई केली जात नाही. नाला उघडा असल्याने व घाण साचल्याने परिसरात दुर्गंधी व डासाचा फैलाव वाढला आहे. घाणीमुळे साथीचे आजार जडत असल्याने नागरिकांना आरोग्य विषयक समस्येला तोंड द्यावे लागत आहे. मुख्य व अंतर्गत रस्त्यावरील पथदिवे पाच-सहा महिन्यापासून बंद आहेत. काही खांबावर तर दिवेच नाहीत. रात्रीच्या वेळी ये-जा करताना नागरिकांची गैरसोय होत असून महिला व लहान मुलांना घराबाहेर पडणे अवघड झाले आहे.
येथील मोकळ्या जागेचा वापर वाहने उभी करण्यासाठी व बांधकाम साहित्य ठेवण्यासाठी केला जात असल्याने लहान मुलांना रस्त्यावर खेळावे लागत आहे. विशेष म्हणजे येथील बंद पडलेली पोलीस चौकी टवाळखोरांचा अड्डा बनली आहे. रात्रीच्या वेळी टवाळखोर येथेचे दारु पित असून उशिरापर्यंत गोंधळ घालत बसतात. टवाळखोराच्या उपद्रवामुळे लगतचे रहिवाशी त्रस्त झाले आहेत. या संदर्भात वारंवार तक्रारी करुनही प्रशासन याकडे लक्ष देत नाही.
त्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचा आरोप येथील छाया कुकलारे, सरस्वती थापा, कविता हंडोरे, अंजली परडकर, गयाबाई वाघ, एस.बी. राजपूत, चतुराबाई कुंभार, रेखा नाईकवाडे, गीता म्हस्के, कविता खेळवणे, प्रिया देशमुख, अनिता शेरे, सोनाली नानोरकर, शांताबाई सुतार, मनिषा ताठे, प्रतिभा निकते, राजू मोरे, नागेश कुकलारे आदी नागरिकांनी केला आहे.