गंगामसला : बीड-परभणी या दोन जिल्ह्यांच्या सीमारेषेवरील ढालेगाव येथील गोदावरी नदीवर असलेला बंधारा १०० टक्के भरला आहे. त्यामुळे गोदाकाठच्या १५ गावांना याचा फायदा होणार असून, त्यांचा पाणीप्रश्न मिटला आहे. बंधाऱ्यात पाणी आल्याने हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली येणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.यावर्षी पावसाळा सुरू होऊन तीन महिने उलटले होते तरीही जोरदार पाऊस झाला नव्हता. यामुळे बंधाऱ्याची पाणीपातळी तळाला जाऊन बंधारा कोरडा पडण्याची स्थिती निर्माण झाली होती. मात्र तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावल्याने हा बंधारा तुडुंब भरला आहे. या बंधाऱ्यात १४.८७ दलघमी एवढा पाणीसाठा आहे. या बंधाऱ्यामुळे २ हजार २४१ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. त्यामध्ये पाथरी तालुक्यातील ११३५ तर माजलगाव तालुक्यातील ११०६ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे.या बंधाऱ्यातील पाण्याचा माजलगाव तालुक्यातील मंजरथ, आळसेवाडी, बोरगाव, आबेगाव, साखर पिंपळगाव, सोमठाणा, आडोळा या गावांना फायदा होणार आहे तर पाथरी तालुक्यातील निवडी पाटोदा, मंडसगाव, गोपेगाव, बाणेगाव, वडी, रामपुरी, ढालेगाव या गावांबरोबर पाथरी तालुक्यालाही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था याच बंधाऱ्यातून ैहोणार आहे. तसेच मत्स्य व्यवसायही वाढणार आहे. मोठीवाडी व गंगामसला या गावांना येथून पाणीपुरवठा होतो यामुळे या गावांचा सुद्धा पाण्याचा प्रश्न मिटला आहे.सध्या बंधाऱ्यामध्ये पाणी भरपूर असल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. याबाबत पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता व्ही.आर. ठोंबरे म्हणाले, आणखी बंधाऱ्याचे काम पूर्ण झालेले नाही, उर्वरित काम तात्काळ पूर्ण करण्यात येईल. बंधाऱ्याच्या पाणीपातळीत वाढ झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. (वार्ताहर)
गोदाकाठच्या गावांचा मिटला पाणी प्रश्न
By admin | Published: September 03, 2014 12:42 AM