औरंगाबाद : शहरातील ५० पेक्षा अधिक वॉर्डांना आजही पाचव्या आणि सहाव्या दिवशी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मनपाचे प्रभारी आयुक्त नवल किशोर राम यांनी नागरिकांना चौथ्या दिवशी पाणी द्या, असे आदेश मागील आठवड्यात दिले. या आदेशाची अंमलबजावणी त्वरित करावी, असेही आयुक्तांनी नमूद केले होते. महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग अजून पाणी देण्याच्या नियोजनातच मग्न आहे.
शहरातील ३० पेक्षा अधिक वॉर्डांना दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी पाणीपुरवठा करण्यात येतो. या वॉर्डांमधील ५० पेक्षा अधिक वसाहतींना २४ तास पाणी मिळते. कारण मुख्य जलवाहिनीवरून वॉर्डांमध्ये पाणी घेण्यात आले आहे. मुख्य जलवाहिनीवरील नळ कनेक्शन, क्रॉस कनेक्शन तोडण्याचे धाडस आजपर्यंत मनपा प्रशासनाने दाखविलेले नाही. राजकीय दबावापोटी आजपर्यंत अधिकारी मूग गिळून गप्प आहेत. सिडको, हडकोसाठी नक्षत्रवाडीहून खास एक्स्प्रेस लाईन एन-५ पर्यंत टाकण्यात आली आहे. या लाईनचीही अक्षरश: चाळणी करण्यात आली आहे. सिडको-हडकोतील नागरिकांना अत्यंत कमी पाण्यावर समाधान मानावे लागत आहे. या भागातील सर्वपक्षीय नगरसेवकांनी आंदोलनाचे हत्यार उपसताच प्रभारी आयुक्त राम यांनी तातडीने पाणीपुरवठा विभागाची बैठक घेतली होती. बैठकीत या विभागाचे दु:ख त्यांनी जाणून घेतले. त्यानंतर संपूर्ण शहरात चौथ्या दिवशी पाणीपुरवठा झाला पाहिजे असे नियोजन करा, असे आदेश दिले. या आदेशाची अंमलबजावणी दुसऱ्या दिवशीपासूनच व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली होती.
लोटाकारंजा, किराडपुरा, सिटीचौक, पानदरिबा, मुकुंदवाडी, विठ्ठलनगर, जयभवानीनगर आदी अनेक वसाहतींना पाचव्या, सहाव्या दिवशी पाणी देण्यात येते. उन्हाळ्यात चौथ्या दिवशी पाणी देण्याच्या उपक्रमाच्या अंमलबजावणीस विलंब होत आहे. मनपाच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी अजून नियोजन करण्यात मग्न आहेत.
पाच तास पाणीपुरवठाशहरातील अनेक वॉर्डांमध्ये भर उन्हाळ्यातही चार ते पाच तास पाणी देण्याची किमया काही लाईनमन करीत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वारंवार सूचना दिल्यानंतरही लाईनमन अजिबात ऐकत नाहीत. राजकीय मंडळी सांगतील तेव्हाच पाणी बंद करण्यात येते. प्रत्येक वॉर्डाला एक ते दीड तास पाणी द्यावे, असे आदेश लाईनमनला देण्यात आले आहेत. ज्या वसाहतींमध्ये पाणी रस्त्यांवरून धो धो वाहत असते, त्याचा आढावा घेऊन महापालिकेने पाणी कमी द्यावे, अशी मागणी होतेय.
तीन टाक्यांमध्ये क्लोरिनची कमतरताजायकवाडीपासून शहरात पाणी आणताना अनेक टप्पे पार पाडावे लागतात. या प्रक्रियेत पाण्याचे क्लोरिनचे प्रमाण झपाट्याने कमी होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सिडको एन-५, एन-७ आणि मरीमाता येथील पाणीपुरवठा केंद्रांवर पाण्यात क्लोरिन अत्यंत नगण्य असल्याचे समोर आले. छावणी प्रयोगशाळेतून अहवाल प्राप्त होताच तिन्ही टाक्यांवरील क्लोरिनचे प्रमाण वाढविण्यात आले.
उन्हाळा सुरू होताच शहरातील पाणी प्रश्न हळूहळू पेटत आहे. पाण्याची मागणीही बरीच वाढली आहे. शहरातील अनेक वसाहतींमध्ये दूषित पाणी येत असल्याच्या तक्रारीही वाढल्या. त्यामुळे तातडीने शहर अभियंता एस.डी. पानझडे, उपअभियंता एम.बी. काझी, कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहेल यांची समिती नेमण्यात आली. समितीने शहरातील पाण्याचे १३ नमुने छावणी येथील प्रयोगशाळेत पाठविले होते. त्यातील सिडको एन-५, एन-७ आणि मरीमाता येथील पाण्याच्या टाक्यांमध्ये क्लोरिनचे प्रमाण कमी असल्याचा अहवाल प्रयोगशाळेने दिला आहे.
विविध आजारांचा धोकापाण्यातील क्लोरिनचे प्रमाण कमी झाल्यास विविध आजारांचा धोका असतो. मनपाकडून जायकवाडी, नक्षत्रवाडीत पाण्याची तपासणी करण्यात येते. शहरात पाण्याच्या विविध टाक्यांवर अशी सोय नाही. त्यामुळे नक्षत्रवाडीहून येणाऱ्या पाण्यात क्लोरिन किती कमी झाले हे कर्मचाऱ्यांना कळत नाही. कर्मचारी टाकीत पाणी किती आले, किती वॉर्डांना पाणी देता येईल, याचा अंदाज बांधून पाणीपुरवठा करतात.
तक्रारी जशास तशाज्या वॉर्डांमध्ये, वसाहतींमध्ये दूषित पाणी येत असल्याच्या तक्रारी मनपाकडे प्राप्त होत आहेत, त्या तक्रारीनुसार पाणीपुरवठा विभागाने काम सुरू केलेले नाही. अनेक ठिकाणी जलवाहिनीच बदलावी लागेल, या कारणावरून दूषित पाण्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. मुकुंदवाडी, अंबिकानगर, पदमपुरा भागात तर गॅस्ट्रोचे रुग्ण अजूनही सापडतच आहेत.